नवी दिल्ली – दिल्लीतील कथित उत्पादन शुल्क घोटाळा (Delhi liquor policy scam) प्रकरणातील सह आरोपी दिनेश अरोरा याला सीबीआयने माफीचा साक्षीदार केले आहे. त्यामुळे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया (Deputy Chief Minister Manish Sisodia) यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे मानले जात आहे.
त्याच्या अर्जावर आता 14 नोव्हेंबर रोजी निर्णय होणार आहे. आपण स्वेच्छेने माफीचा साक्षीदार होण्यास तयार झालो आहोत असे त्याने आज कोर्टात सांगितले. या प्रकरणातील सारी तथ्ये आपण कोर्टापुढे सादर करू असे त्याने आज कोर्टात नमूद केले. या पार्श्वभूमीवर त्याला जामीनही मंजुर झाला आहे. या आधी त्याने सीबीआय पुढे कबुली जबाब दिला आहे.
या प्रकरणात मनिष सिसोदिया यांना अडकवण्यासाठी भाजपने जंगजंग पछाडले असले तरी त्यांना या प्रकरणात अजून कोणताही सबळ पुरावा मिळालेला नाही. या पार्श्वभूमीवर आता आरोपीलाच माफीचा साक्षीदार करून पुन्हा सिसोदिया यांना अडकवण्याचा व्यर्थ प्रयत्न भाजपकडून केला जात असल्याचा दावा आम आदमी पक्षाच्यावतीने केला जात आहे.