वॉशिंग्टन – अफगाणिस्तान सरकारसाठी अमेरिका आणि नाटो फौजांनी तब्बल 83 अब्ज डॉलर्सची रक्कम खर्च करून प्रशिक्षीत लष्कर व पोलिस दल उभारले होते. आता तालिबानने संपुर्ण अफगाणिस्तानवर कब्जा केल्याने हा सारा खर्च वाया गेला असून तेथील लष्कर व पोलिस दलासाठी पुरवण्यात आलेली शस्त्रे आणि दारूगोळा आता तालिबान्यांच्या हातात आयता सापडला आहे.
तालिबान्यांकडे शस्त्रांची मोठी कमतरता होती. ती सारी कमतरता आता यामुळे दूर झाली असून तालिबान्यांना आयतेच घबाड हाती आल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. त्याचा वापर यापुढील काळात कसा केला जाईल याची पुर्ण कल्पना अजून आलेली नाही.
तथापि त्यातून आता जगापुढील धोका कमालीचा वाढणार आहे अशी आशंका अमेरिकेतील सुरक्षा तज्ज्ञांनी बोलून दाखवली आहे. लढाऊ विमाने,अत्याधुनिक शस्त्रे, तोफा, आधुनिक मशिनगन्स अशी सारीच सामग्री तालिबान्यांच्या हातात पडली आहे.
अमेरिकेने अफगाणिस्तानच्या लष्करासाठी प्रचंड शस्त्र सामग्री व दारूगोळा साठा पुरवला होता, तो साराच्या सारा आता तालिबान्यांच्या हातात पडला आहे असा दुजोरा एका अमेरिकन लष्करी अधिकाऱ्याने दिला आहे. अफगाणि लष्कराच्या हातात जगातील सर्वात दर्जेदार शस्त्रे होती, वाहने विमाने, रणगाडे असा सारा लवाजमा त्यांच्याकडे होता पण ते लढलेच नाहीत.
त्यांच्याकडे सगळी जय्यत तयारी असताना त्यांच्याकडे केवळ लढण्याचेच मनोधैर्य नव्हते त्यातून हा सारा प्रताप घडला आहे आत या साऱ्या स्थितीचा यापुढील काळात सर्वंकष अभ्यास केला जाईल असेही या अधिकाऱ्याने सांगितले. अफगाणि फौजेकडे पैसाही होता, पण पैशाने इच्छाशक्ती विकत घेता येत नाहीं हाच या प्रकरणाचा धडा आहे असेही तो म्हणाला.
अमेरिकेतील निवृत्त लष्करी गुप्तचर अधिकारी डॉग ल्युट यांनी म्हटले आहे की, तुम्ही कितीही शस्त्रसज्ज असाल किंवा तुमच्याकडे कितीही पैसा असेल तरीही लष्कराकडे जो पर्यंत नैतिकता, शिस्त, नेतृत्व आणि युनिट मधील समन्वय अशा बाबींचा अभाव असेल तर त्याचा काहीं एक उपयोग नसतो. त्याउलट संख्येने आणि साधनसामग्रीच्या तुलनेत अत्यंत तोकडे असलेले तालिबानी आज तेथे यशस्वी झाले आहेत.
त्यांच्याकडे हवाईदलाची शक्ती नव्हती ती अफगाणिस्तान सरकारच्या फौजेकडे होती. पण तरीही त्यांनी नांगी टाकली. अध्यक्ष बायडेन यांनी जेव्हा निर्णायक माघारीची घोषणा केली त्यावेळी तालिबान इतक्या वेगाने पुढे येईल याचा अंदाज अमेरिकन गुप्तचरांनाही घेता आला नाही हे दुर्देव आहे असेही त्यांनी म्हटले आहे.