श्री विघ्नहर साखर कारखान्याची 43 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

ओझर – श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याची ४३ वी अधिमंडळ वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी, दि. २० रोजी दुपारी २ वाजता कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या सभेला सभासद बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेच्या प्रारंभी कारखान्याचे संस्थापक स्व. निवृत्तीशेठ शेरकर व स्व. सोपानशेठ शेरकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. चेअरमन सत्यशील शेरकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करत प्रस्ताविकात मागील २०२४-२५ गळीत हंगामात ऊस उत्पादकांना इतर कारखान्यांपेक्षा कमी दर न देण्याची ग्वाही दिली. तसेच, २०२५-२६ हंगामात सभासदांनी संपूर्ण ऊस कारखान्याला देऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्यांनी कारखान्याच्या आधुनिकीकरण, विस्तारीकरण आणि यंत्रसामग्रीच्या चाचणीबाबत सविस्तर माहिती दिली.
सभासदांचा सत्कार
मागील हंगामात जास्तीत जास्त ऊस पुरवठा करणारे शेतकरी, एकरी १११ टनांपेक्षा जास्त उत्पादन घेणारे शेतकरी, ऊस तोडणी व वाहतूक करणारे कंत्राटदार, तसेच हार्वेस्टरद्वारे जास्तीत जास्त ऊस तोडणी करणाऱ्या कंत्राटदारांचा रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच, शेठ बाबांच्या जयंतीनिमित्त आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांचा आणि सभासद शंकर कोरडे यांच्या नात कुमारी डॉ. सिद्धी कोरडे हिने नीट-पीजी (MD Entrance) परिक्षेत भारतात १५ वा व महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
आधुनिकीकरण आणि विस्तारीकरण
कारखान्याची ४० वर्षे जुनी यंत्रसामग्री असल्याने मेंटेनन्सचा खर्च वाढल्याने विस्तारीकरणाचा निर्णय घेण्यात आला. कारखान्याची गाळप क्षमता ५,००० मेट्रिक टनांवरून ७,५०० मेट्रिक टनांपर्यंत वाढविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. २०२५-२६ हंगामात दररोज ८,००० ते ८,५०० मेट्रिक टन गाळप होईल, असे शेरकर यांनी सांगितले.
सभासदांचा उत्स्फूर्त सहभाग
सभेतील सर्व विषय एकमताने मंजूर झाले. सभासदांनी चेअरमन सत्यशील शेरकर व संचालक मंडळाच्या पारदर्शक व उत्कृष्ट कामकाजाचे कौतुक केले. स्मार्ट शेतकरी कार्ड, संगणकीकरण आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे कारखान्याची प्रगती समाधानकारक असल्याचे सभासदांनी नमूद केले. सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना शेरकर यांनी समाधानकारक उत्तरे दिली, ज्यामुळे सभेत उत्साहाचे वातावरण होते. शेरकर यांनी सभासदांना कोणत्याही शंकांसाठी कारखान्याच्या संबंधित विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.
ऊस विकास विभाग
एकरी ऊस उत्पादन वाढविण्यासाठी कारखान्याने स्वतंत्र ऊस विकास विभाग स्थापन केला असून, नवीन कर्मचाऱ्यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी, पुणे व पाडेगाव ऊस संशोधन केंद्रात प्रशिक्षण देण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांची प्रत्येक गटात नियुक्ती करण्यात आली असून, शेतकऱ्यांनी ऊस विकास विभागाचे मार्गदर्शन घ्यावे, असे शेरकर यांनी सांगितले.
राष्ट्रीय पुरस्काराचा गौरव
कारखान्याला नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज, नवी दिल्ली यांच्याकडून २०२३-२४ हंगामासाठी उच्च साखर उतारा व उत्कृष्ट ऊस विकासासाठी प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. याबद्दल सभासदांनी चेअरमन, व्हाइस चेअरमन व संचालक मंडळाचा सत्कार केला.
सभासदांचा सहभाग
सभेत सभासद सुनिल कवडे, गजानन हाडवळे, आंबादास हांडे, ह.भ.प. एकनाथ महाराज तांबे, संतोष चव्हाण, मच्छिंद्र कबाडी, सुरेश वाणी, अविनाश भोर, निलेश बेनके, मनोहर शेटे, देवराम कुटे, शामराव शेरकर, विजय भोर यांनी चर्चेत सहभाग घेतला. सभेचे विषयपत्रिका वाचन कार्यकारी संचालक भास्कर घुले यांनी केले, दुःखवट्याचा ठराव सेक्रेटरी अरुण थोरवे यांनी मांडला, तर आभारप्रदर्शन व्हाइस चेअरमन अशोक घोलप यांनी केले.




