श्री विघ्नहर साखर कारखान्याचे ऊस लागवड धोरण जाहीर

ओझर – श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची नुकतीच झालेल्या बैठकीत गळीत हंगाम २०२६-२७ साठी पुरेसा ऊस उपलब्ध व्हावा यासाठी लागवड हंगाम २०२५-२६ मध्ये ऊस लागवडीचे धोरण १ जून २०२५ पासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी दिली.
ऊस लागवडीचे धोरण:
शेरकर यांनी सांगितले की, आडसाली ऊस लागवडीसाठी १ जून ते ३१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत को. ८६०३२, को. एम. ०२६५, पीडीएन. १५०१२, कोव्हिएसआय-१८१२१, पीडीएन. ११०८२, पीडीएन. १५००६ आणि पीडीएन. १३००७ या ऊस जातींच्या लागवडीस परवानगी देण्यात आली आहे. पूर्वहंगामी लागवडीसाठी १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंतचा कालावधी निश्चित करण्यात आला असून, त्यात को. ८६०३२, को. एम. ०२६५, पीडीएन. १५०१२, कोव्हिएसआय-१८१२१, पीडीएन. ११०८२, पीडीएन. १५००६, पीडीएन. १३००७, को-९०५७ आणि व्हीएसआय-०८००५ या जातींची लागवड करता येईल. सुरू हंगामासाठी १ डिसेंबर २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत वरील जातींसह को. एम. ०२६५ (डिसेंबर महिन्यासाठी) लागवडीस परवानगी आहे. यानुसार, कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व सभासद आणि ऊस उत्पादकांना १ जून २०२५ पासून या जातींचे बेणे उपलब्धतेनुसार वाटप केले जाईल.
ऊस विकास अभियान:
कारखान्यामार्फत ऊस विकास अभियान राबवले जात असून, शेतकऱ्यांना उधारीवर ऊस बेणे आणि रोपांचा पुरवठा केला जातो. लागवडीनंतर प्रति एकरी उत्पादन वाढीसाठी बांधावर जाऊन मार्गदर्शन, जीवाणू खतांचा पुरवठा, हिरवळीच्या खतासाठी ताग बियाणे, ठिबक सिंचन योजना, मल्टीमायक्रोन्युट्रियंट, ह्युमिक अॅसिड, वसंत ऊर्जा, ईपीएन जैविक कीटकनाशक यांचा पुरवठा केला जातो. तसेच, मोफत माती परीक्षण आणि विघ्नहर कृषी अमृत (FOM) हे सेंद्रिय खत ५० किलोच्या पॅकिंगमध्ये माफक दरात उपलब्ध करून दिले जाईल.
हुमणी किड नियंत्रण:
हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २००३-०४ पासून शेतकरी आणि मजुरांकडून प्रति किलो २०० रुपये रोख देऊन भुंगेरे गोळा करून नष्ट केले जातात. यंदा २६ मे ते ३० जून २०२५ या कालावधीत शेतकऱ्यांनी भुंगेरे कारखाना गट कार्यालयात जमा करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण आणि पुरस्कार:
ऊस उत्पादकांना नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि यांत्रिकीकरणाची माहिती व्हावी यासाठी व्हीएसआय आयोजित ज्ञानयाग आणि ज्ञानलक्ष्मी प्रशिक्षण कार्यक्रमात कारखाना खर्चाने शेतकऱ्यांना पाठवले जाते. प्रति एकरी १०० ते ११० मे. टन आणि त्याहून अधिक उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम देऊन गौरवले जाते. तसेच, व्हीएसआयच्या ऊस भूषण पुरस्कारासाठी कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचा सहभाग नोंदवला जातो. आतापर्यंत पाच शेतकऱ्यांना हा पुरस्कार मिळाला आहे.
शेतकऱ्यांना आवाहन:
सर्व ऊस उत्पादकांनी या योजनांचा लाभ घेऊन जास्तीत जास्त ऊस कारखान्याकडे नोंदवून गाळपासाठी द्यावा, असे आवाहन चेअरमन सत्यशील शेरकर यांनी केले.





