बुलढाण्यातील 12 वर्षीय विद्यार्थाचा मृत्यू उष्माघातामुळे नाही; वैद्यकीय अहवालातून कारण आलं समोर

Buldhana News | राज्यातील काही भागातील तापमान 40 अंश सेल्सियसच्याही पुढे गेले आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात वाढत्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहे. यातच बुलढाणा जिल्ह्यातील संस्कार सोनटक्के या विद्यार्थ्यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलं होतं.
अकोला जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून बुलढाणा जिल्हा शल्य चिकित्सक यांना संस्कार सोनटक्के या विद्यार्थाच्या मृत्यूबाबत कळवण्यात आले होते. मात्र, संस्कारचा मृत्यू उष्माघातामुळे झाला नसल्याचं आता समोर आलं आहे.
12 वर्षीय मुलाचा मृत्यू उष्माघाताने नाही तर…
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील संस्कार सोनटक्के या 12 वर्षीय मुलाचा मृत्यू हा उष्माघाताने नसून विषाणूजन्य मेंदू ज्वराने झाला असल्याचं स्पष्टीकरण अकोला महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाचे डॉ. आशिष गिऱ्हे यांनी दिले आहे.
दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील 12 वर्षीय संस्कार सोनटक्के या विद्यार्थ्याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर बुलढाणा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांनी नागरिकांना काळजी घेण्याचा आवाहन केलं आहे.
उन्हाच्या वेळेस घराच्या बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावं, तसंच उष्माघाताची लक्षणे व आढळल्यास तात्काळ शासकीय रुग्णालयात वैद्यकीय मदत घ्यावी, असे आवाहनही जिल्हा शल्य चिकित्सक यांनी जनतेला केले आहे.
शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याच्या सूचना
दरम्यान, राज्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये, यासाठी राज्यातील सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरविण्यात याव्यात, असा आदेश काही दिवसांपूर्वी राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिला आहे. विद्यार्थ्यांना उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी या शाळांनाही त्यांच्या वेळापत्रकात आवश्यक ते बदल करण्याची सूचना दिली आहे, असेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
दुसरीकडे, उष्णतेच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा प्रशासनाने तातडीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. जिल्हा रुग्णालयात उष्माघातासाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात येत आहे.
हेही वाचा :
नागपूर एमआयडीसीमध्ये भीषण स्फोट, चार कामगारांचा मृत्यू, अनेकजण जखमी





