Chitra Wagh : “तो नराधम लवकरच पकडला जाईल आणि…”; अहिल्यानगरमधील मुलीवरील अॅसिड हल्ला घटनेप्रकरणी चित्रा वाघ यांची संतप्त प्रतिक्रिया
Chitra Wagh : अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात घडलेल्या घटनेप्रकरणी चित्रा वाघ यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

Chitra Wagh : काल १७ मार्च रोजी महाराष्ट्राला हादरवून टाकणारी एक घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात घडली आहे. इयत्ता सहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अज्ञात तरूणाकडून ॲसिड हल्ला करण्यात आला. या विकृत घटनेने जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
संबंधित मुलगी सहावीच्या वर्गात शिक्षण घेत असून, शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना अचानक तिच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकण्यात आले. या हल्ल्यानंतर हल्लेखोर पसार झाला. या घटनेने महाराष्ट्रातून संतापाची लाट उसळली आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल राज्य महिला आयोगाने घेतली असून, आरोपीचा शोध घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे. “मी स्वतः या प्रकरणातील संगमनेर पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी प्रवीण साळुंखे यांच्याशी संपर्क साधून तातडीने आरोपीचा शोध घेण्याचे निर्देश दिले आहेत,” अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी दिली.
या धक्कादायक घटनेप्रकरणी भाजप नेत्या आमदार चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तो नराधम लवकरच पकडला जाईल आणि त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल. शासन या प्रकरणात कोणतीही तडजोड करणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
सोशल मीडिया एक्सवरुन चित्रा वाघ यांनी या घटनेचा निशेष नोंदवला आहे. वडगाव पान येथे शाळेतून घरी जात असताना सहावीत शिकणाऱ्या चिमुकलीवर ऍसिड हल्ला झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली. संबंधित मुलगी सध्या रुग्णालयात उपचाराधीन असून शासनाकडून तिला सर्वोत्तम वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली जात आहे. पीडित कुटुंबाशी संवाद साधून त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक स्वतः घटनास्थळी असून तपास वेगाने सुरू आहे. आरोपीच्या शोधासाठी १० विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. स्वतः राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस तसेच पालकमंत्री मा. विखे पाटील हे या प्रकरणावर लक्ष ठेवून असून संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या जात आहेत. त्या चिमुकलीला लवकर बरे वाटावे, ही स्वामी चरणी प्रार्थना असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.
मुलीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती
लोणी येथील संबंधित अल्पवयीन मुलीवर प्रवरा रुग्णालायत उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, मुलीच्या उजव्या बाजूवरील डोळा व त्याच्या खालील भागावर मोठी इजा झाली आहे.
रस्ता रोको आंदोलन
मुलीच्या नातेवाईकांनी आरोपीला पकडून कडक शासन करण्याची मागणी केली आहे. तर स्थानिक ग्रामस्थांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ॲसिड हल्ल्याच्या निषेधार्थ आज १८ मार्चला वडगावपानमधील ग्रामस्थ रास्ता रोको आंदोलन करणार आहेत.
नेमकं काय घडलं?
घरापासून २ किमी अंतरावर असलेल्या शाळेत संबंधित मुलगी सहावीत शिकत आहे. ती दररोज सायकवरुन शाळेला जात असायची. घटनेच्या दिवशी देखील ती नेहमी प्रमाणे शाळेत गेली. पण तिच्यासाठी कालचा दिवस अतिशय भयानक ठरला. शाळा सुटल्यानंतर घरी परतत असताना नराधम अज्ञात तरुणाने मुलीवर अॅसिड हल्ला केला. मुलीने आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेतली. पण अज्ञात हल्लेखोर घटनास्थळावरुन पसार झाला होता. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे.





