Rohit Pawar : …त्यामुळे एनडीएसोबत मी जाणार नाही; रोहित पवारांनी ठणकावून सांगितलं; भाजपवर केला गंभीर आरोप म्हणाले…
Rohit Pawar : या चर्चांवर अखेर आमदार रोहित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करत मोठं वक्तव्य केलं आहे.

Rohit Pawar clarified his stance on the merger : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर शरद पवार गट एनडीएसोबत सत्तेत सहभागी होणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी दिल्लीत एक मोठी घडामोड घडली. शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल पटेल आणि खासदार पार्थ पवार यांनी भेट घेतली.
या भेटीत संभाव्य दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणावर चर्चा झाली असल्याची चर्चा आहे. या चर्चांना सीजेपीचं आंदोलन सुरू असल्याने ब्रेक लागला होता. तसेच नुकतीच खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीमुळे पडद्याआड मोठ्या राजकीय घडामोडी शिजत असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या चर्चांवर अखेर आमदार रोहित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करत मोठं वक्तव्य केलं आहे.
“शरद पवार एनडीएसोबत जाणार नाहीत. आमच्याकडचे बहुतांश आमदार-खासदार लढाईला तयार आहेत. मी लोकांसोबत, विचारासोबत राहिलो आहे. त्यामुळे पुढे जाऊन देखील मी लढणार आहे. एनडीए सोबत मी जाणार नाही.” असे रोहित पवार यांनी ठामपणे सांगितलं. तसेच सुप्रिया सुळे यांनी घेतलेल्या भेटीवर रोहित पवारांनी भाष्य केलं. ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
नेमकं काय म्हणाले रोहित पवार?
“विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी शरद पवार मोदींना भेटले. युवा वर्गावर होणारा अन्याय त्यांनी मांडला आहे. सुप्रिया सुळे या अमित शाह यांना भेटल्या. 10 ऑगस्टला दिल्लीत रेवती सुळे-सारंग लखानी यांच्या लग्नाचे रिसेप्शन होणार आहे. त्या कार्यक्रमाला खासदार केंद्रीय मंत्री देखील येणार आहेत. शरद पवार एनडीएसोबत जाणार नाहीत. आमच्याकडचे बहुतांश आमदार-खासदार लढाईला तयार आहेत. मी लोकांसोबत, विचारासोबत राहिलो आहे. त्यामुळे पुढे जाऊन देखील मी लढणार आहे. एनडीए सोबत मी जाणार नाही.”
भाजप सरकार आल्यानंतर पेपर फुटले : रोहित पवारांचा गंभीर आरोप
भाजप सरकार राज्यात आल्यापासून वेगवेगळ्या विभागाचे पेपर फुटत आहेत, असा गंभीर आरोपही रोहित पवारांनी केला. जर सीईटीचा पेपर सुद्धा फुटत असेल ते गंभीर असल्याचे त्यांनी नमूद केले. भाजपकडून ज्या राज्यात भाजप सरकार नाही, तिथे पेपर फुटला तर भाजप आंदोलन करत आहे. माझं म्हणणं आहे त्यांनी महाराष्ट्रात आंदोलन करावं, असेही रोहित पवार म्हणाले. सीईटी परीक्षेबाबत आक्षेप घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी आम्हाला माहिती दिली आहे. सध्या आम्ही सर्व पुरावे गोळा करत आहोत. पुरावे पूर्णपणे समोर आल्यानंतरच यावर सविस्तर भूमिका मांडू, असे रोहित पवारांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आगामी काळात रोहित पवार नेमकी काय भूमिका मांडणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.






