Someshwar Election : तो निर्णय पडला महागात! पुरुषोत्तम जगताप यांच्या पराभवाचे कारण…
Someshwar Election : या निवडणुकीत तीन पॅनेल मैदानात असल्याने बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अखेर मतदारांनी सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला कौल दिला.

Someshwar Election : महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने दणदणीत विजय मिळवला आहे. ‘श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेल’ने २१ पैकी २१ जागा जिंकत कारखान्यावर एकहाती सत्ता प्रस्थापित केली. या निवडणुकीत स्वतंत्र पॅनेल उभं करणारे पुरुषोत्तम जगताप यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला. त्यांच्या पॅनेलला मतदारांनी नाकारल्याने या निकालाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
बंडखोरीचा निर्णय महागात पडला? (Someshwar Election)
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी १२ ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता सुरू झाली. या निवडणुकीत तीन पॅनेल मैदानात असल्याने बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अखेर मतदारांनी सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला कौल दिला.
पुरुषोत्तम जगताप हे गेल्या १३ वर्षांपासून कारखान्याचे संचालक म्हणून कार्यरत होते. यंदाच्या निवडणुकीतही ते इच्छुक होते. मात्र, निवडणुकीला काही दिवस शिल्लक असताना त्यांनी स्वतंत्र पॅनेल उभं करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या भूमिकेमुळे निवडणुकीतील राजकीय समीकरणं बदलली. त्यांच्या स्वतंत्र पॅनेलला तालुक्यातील एका माजी आमदाराचा पाठिंबा असल्याचीही चर्चा होती. (Someshwar Election)
धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची चर्चा (Someshwar Election)
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान धनशक्ती आणि जनशक्ती या मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप झाले. पुरुषोत्तम जगताप यांच्या कार्यकर्त्यांकडून पैसे वाटपाचे आरोप करण्यात आल्याची चर्चा होती. दुसरीकडे, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलच्या प्रचारात विरोधकांवर जोरदार टीका करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे तसेच शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांनी प्रचारसभांमधून विरोधकांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.
अजित पवारांच्या आठवणींचा प्रभाव
दिवंगत नेते अजित पवार यांचा सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याशी असलेला संबंध आणि परिसरातील राजकीय प्रभाव या निवडणुकीत चर्चेचा विषय ठरला. त्यांच्या निधनानंतरही समर्थकांमध्ये असलेल्या भावनिक जिव्हाळ्याचा सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलला फायदा झाला.
पुरुषोत्तम जगताप यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव
या निवडणुकीत पुरुषोत्तम जगताप यांना मोठा धक्का बसला. त्यांचा ६,४९० मतांच्या फरकाने पराभव झाला, तर त्यांच्या विरोधातील विक्रम भोसले यांना १३,८५४ मतं मिळाली. २१ पैकी २१ जागांवर विजय मिळवत सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलने कारखान्यावरील आपलं वर्चस्व कायम असल्याचे दाखवून दिले आहे. दुसरीकडे, स्वतंत्र पॅनेल उभं करण्याचा पुरुषोत्तम जगताप यांचा निर्णय त्यांना मोठा फटका देणारा ठरला असल्याची चर्चा स्थानिक राजकीय वर्तुळात रंगत आहे.
Pune Water Cut: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! दर गुरुवारी पाणीपुरवठा राहणार बंद






