मुंबई – शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्या अडचणीत भर पडली आहे. दिघे यांना मुंबई पोलिसांनी चौकशीचे समन्स बजावले आहे. बलात्कार पीडितेला धमकावण्याचा गंभीर आरोप आहे. या आरोपामध्ये केदार यांची चौकशी होणार आहे. केदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय गुरू आनंद दिघे यांचे पुतणे आहेत. मुंबईतील एन एम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात केदार दिघेंविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
काय आहे प्रकरण
केदार दिघे यांच्यावर बलात्कार पीडितेला धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केदार दिघे यांचे मित्र आणि मुख्य आरोपी रोहित कपूर यानं २८ जुलै रोजी लोअर परळ येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये एका तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. आरोपी कपूर यानं धनादेश देण्यासाठी पीडितेला हॉटेलमध्ये बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. तसेच पीडित तरुणीने याबाबत तक्रार करू नये, म्हणून केदार दिघे यांनी तिला धमकावलं आहे, असा आरोप पीडित तरुणीनं केला आहे.
राष्ट्रीय जनता दलाच्या अध्यक्षपदाची धुरा तेजस्वी यादव यांच्याकडे जाणार?
स्वत:च्या स्वार्थासाठी चुकीची कारवाई करू नका…
याच प्रकरणामध्ये दिघे यांचं नाव समोर आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा दिला आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी चुकीची कारवाई कराल, तर शिवसैनिकांसह तुमच्या घरावर मोर्चा काढावा लागेल, असं ते म्हणाले. केदार दिघे यांनी ट्वीट करत मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे. ते म्हणाले, ”हा शिवसैनिकांच्या मनातील संताप आहे. ठाणे हा शिवसेनेचा, दिघेसाहेबांचा बालेकिल्ला आहे. जर जिल्ह्यातील सामान्य शिवसैनिकांना सत्तेचा वापर करून स्वार्थासाठी चुकीची कारवाई कराल, दबाव टाकाल तर मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील घरावर शिवसैनिकांना सोबत घेऊन मोर्चा काढावा लागेल.”
महाविकास आघाडीला आणखी एक धक्का; मुंबई बँक अध्यक्षपदी प्रवीण दरेकर यांची बिनविरोध निवड