Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणात मोठी अपडेट; आरोपी 10 दिवस आधीच मुंबईत, 45 मिनिटे मैदानाबाहेर….
Tiger Shroff : टायगर श्रॉफच्या कारवरील हल्ल्याप्रकरणी तिन्ही आरोपींना कोटा येथे अटक करण्यात आली. आरोपी १० दिवस आधी मुंबईत आले होते आणि मैदानाबाहेर ४५ मिनिटे थांबले होते.

Tiger Shroff : अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींनी या घटनेची आधीच तयारी केल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आली आहे. तिन्ही आरोपी सुमारे १० दिवस आधी मुंबईत आल्याचे सांगितले जात आहे. टायगरच्या हालचालींवर त्यांनी लक्ष ठेवले होते. तो दर रविवारी जुहू येथील फुटबॉल मैदानात जात असल्याची माहिती आरोपींना होती.
१८ ऑक्टोबर रोजी टायगर सायंकाळी सुमारे ५ वाजता जुहू फुटबॉल मैदानात पोहोचला. त्याच्या मैदानातून बाहेर येण्याच्या आधीच आरोपी तेथे पोहोचले होते. सुमारे ४५ मिनिटे ते मैदानाबाहेर थांबून टायगरची वाट पाहत होते.
सुमारे ७ वाजता टायगर फुटबॉल खेळून मैदानाबाहेर आला. त्याने काही चाहत्यांसोबत सेल्फी घेतली आणि कारमध्ये बसला. कार गेटजवळ पोहोचताच दोन आरोपींनी वाहनाच्या दिशेने सात राऊंड गोळीबार केला. त्यानंतर तिघेही दुचाकीवरून तेथून पसार झाले. या घटनेत टायगरचा चालक आणि एक चाहता जखमी झाल्याची माहिती आहे.
घटनेनंतर टायगरने स्वतः कार चालवत रुग्णालय गाठल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्याच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली. रात्री उशिरा लॉरेन्स गँगशी संबंधित अनिल पंडित याने या घटनेची जबाबदारी घेतल्याचा दावा करण्यात आला.
दरम्यान, मुंबई पोलिसांनी तपास सुरू करत राजस्थान पोलिसांच्या मदतीने तिन्ही आरोपींना कोटा येथून अटक केली. ते रेल्वे कॉलनी परिसरात लपून बसल्याची माहिती माहिती मिळाली होती. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी त्यांचा माग काढला. मुंबई पोलिसांना त्यांची शेवटची लोकेशन अंधेरी रेल्वे स्थानक परिसरात मिळाली होती. त्यानंतर तिघेही मुंबईहून दिल्लीच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेतून निघाले होते.
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी जयपूर येथे उतरून तेथून बसने दिल्लीला जाणार होते. त्यानंतर रस्त्याने नेपाळच्या दिशेने जाण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्यापूर्वीच कोटा येथे पोलिसांनी त्यांना पकडले. या प्रकरणाचा पुढील तपास मुंबई आणि राजस्थान पोलिसांकडून सुरू आहे.





