मोठी बातमी! थायलंडमध्ये भूकंपात 144 ठार, 832 जखमी; बँकॉकमध्ये इमारती कोसळल्या, बचावकार्याला वेग

बँकॉक – थायलंडची राजधानी आणि जागतिक पर्यटनस्थळ असलेल्या बँकॉकमध्ये शुक्रवारी (28 मार्च 2025) दुपारी 7.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तीशाली भूकंप झाला. या भीषण भूकंपामुळे अनेक गगनचुंबी इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, तर अब्जावधी रुपयांची मालमत्ता उद्ध्वस्त झाली. म्यानमार आणि थायलंडमध्ये मिळून 144 जणांचा मृत्यू झाला, तर 832 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. म्यानमारच्या सरकारी एमआरटीव्हीने टेलिग्रामवर ही माहिती दिली. जर्मनीच्या GFZ भूगर्भशास्त्र केंद्रानुसार, हा भूकंप 10 किलोमीटर खोलीवर झाला, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.
बँकॉकमध्ये दुपारी 1:30 वाजता भूकंपाचे धक्के जाणवताच इमारतींमध्ये अलार्म वाजले आणि लोकांना बाहेर काढण्यात आलं. उंच इमारतींवरील जलतरण तलावातील पाणी उसळतानाचे धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाले. भूकंपाचा केंद्रबिंदू म्यानमारच्या सागिंग शहराजवळ होता, जिथून 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या मोनीवा शहरातही मोठं नुकसान झालं. म्यानमारमध्ये इमारती, रस्ते आणि पूल उद्ध्वस्त झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त करत मदतीचं आश्वासन दिलं आहे.
बँकॉकमध्ये गगनचुंबी इमारत कोसळली
बँकॉकमध्ये एका निर्माणाधीन गगनचुंबी इमारतीला भूकंपाचे धक्के सहन झाले नाहीत आणि ती जमीनदोस्त झाली. या घटनेनंतर लोकांमध्ये प्रचंड घबराट पसरली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये लोक रस्त्यावर पळताना दिसत आहेत. बचावकार्याला वेग आला असून, मलब्यात अडकलेल्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
सागिंगजवळ भूकंपाचा केंद्रबिंदू
भूगर्भशास्त्रज्ञांनी सांगितलं की, भूकंपाचा केंद्रबिंदू म्यानमारच्या सागिंग परिसरात होता. 7.7 रिश्टर तीव्रतेचा हा भूकंप दोन तासांपूर्वीच्या हलक्या धक्क्यांनंतर आला. GFZ आणि भूवैज्ञानिक सर्वेक्षणानुसार, भूकंपाची खोली 10 किलोमीटर होती, ज्यामुळे थायलंड आणि म्यानमारमध्ये जोरदार हादरे जाणवले. या नैसर्गिक संकटामुळे दोन्ही देशांमध्ये बचाव आणि पुनर्वसनाचे काम वेगाने सुरू आहे.



