म्यानमारमध्ये भूकंपामुळे प्रचंड विध्वंस ! १६०० हून अधिक लोकांचा मृत्यू ; अन्न, वीज अन् पाण्यासाठी नागरिक आसुसले

Earthquake in Myanmar । म्यानमारची राजधानी नेपितॉ याठिकाणी डॉ दिवसापूर्वी झालेल्या ७.७ रिश्टर स्केलच्या महाभयानक भूकंपानंतर, शनिवारीही अनेक राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. काल देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर मंडाले याठिकाणीही ७.७ तीव्रतेचा भूकंप झाला. त्यामुळे आता म्यानमारमध्ये भूकंपामुळे मृतांचा आकडा १६०० पेक्षा जास्त झाला. मात्र, बचाव पथकाने दुसऱ्या दिवशीही अथक प्रयत्न सुरू ठेवले.
परदेशी बचाव पथकांनाच या मोहिमेत काल समावेश झाल्यावर अनेक मृतदेह सापडले. एका वृत्तसंस्थेनुसार, म्यानमारच्या लष्करी सरकारच्या प्रमुखांनी १६४४ हून अधिक मृत्यूंची पुष्टी केली आहे, तर एका अमेरिकन एजन्सीने इशारा दिला आहे की ही संख्या १०,००० पेक्षा जास्त असू शकते.
सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान Earthquake in Myanmar ।
शक्तिशाली भूकंपामुळे रस्ते, पूल आणि इतर सार्वजनिक पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे अनेक भाग अजूनही संपर्कापासून खंडित आहेत. म्यानमारच्या लष्करी सरकारने सांगितले की शनिवारी झालेल्या भूकंपातील मृतांची संख्या १,६४४ वर पोहोचली आहे. तर किमान २,४०० लोक जखमी झाले आहेत. अनेक भागात बचावकार्य जोरात सुरू आहे, परंतु रस्ते आणि पुलांचे नुकसान झाल्यामुळे अनेक ठिकाणी पोहोचणे अजूनही कठीण आहे.
पंतप्रधान मोदींनी दिले सर्वतोपरी मदतीचे आश्वासन Earthquake in Myanmar ।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्यानमारमधील लष्कराच्या नेतृत्वाखालील सरकारचे प्रमुख मिन आंग ह्लाईंग यांच्याशी संवाद साधला आणि सांगितले की, “या विध्वंसाला तोंड देण्यासाठी भारत म्यानमारसोबत एकजुटीने उभा आहे. एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, “म्यानमारचे वरिष्ठ जनरल महामहिम मिन आंग ह्लाईंग यांच्याशी बोललो. विनाशकारी भूकंपात झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या नुकसानाबद्दल माझ्या तीव्र संवेदना व्यक्त केल्या. एक जवळचा मित्र आणि शेजारी म्हणून, भारत या कठीण काळात म्यानमारच्या लोकांसोबत एकजुटीने उभा आहे.”
त्याच वेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदत करण्याची भारताची तयारी जाहीर केल्यानंतर, भारताने हवाई दलाच्या विमानाद्वारे सौर दिवे, अन्न पॅकेट्स आणि स्वयंपाकघर संचांसह १५ टन मदत साहित्य म्यानमारला पाठवले. ऑपरेशन ब्रह्माची माहिती देताना परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, विशेष उपकरणे आणि स्निफर डॉगसह सुसज्ज असलेल्या एनडीआरएफच्या ८० बचाव पथके नेप्टाला रवाना झाली आहेत. याशिवाय, भारतीय नौदलाची जहाजे आयएनएस सातपुरा आणि आयएनएस सावित्री ४० टन मानवीय मदत घेऊन यंगून बंदराकडे जात आहेत, असे त्यांनी सांगितले.





