ठाकरेसेनेला लागणार गळती! छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर करणार शिंदेसेनेत प्रवेश

मुंबई/छत्रपती संभाजीनगर – विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. आता पुढील काही महिन्यांत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
त्यामुळे आतापासून जवळपास सर्वच राजकीय पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारीला लागले आहेत. अशातच आगामी निवडणूकांपूर्वी ठाकरेसेनेला गळती लागणार असल्याचे दिसून येत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आतापासून योजना आखण्यास सुरुवात केली आहे.
तसेच काही दिवसांपूर्वी ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनीही आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्यासंदर्भात सूचक वक्तव्य केले होते. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर नंदकुमार घोडेले हे शिंदेसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे निवडणुकीपूर्वी ठाकरेसेनेला हा धक्का मानला जात आहे.
साळवींकडून पक्ष बदलाचे संकेत
ठाकरेसेनेचे माजी आमदार राजन साळवी हे काही दिवसांपासून नाराज असल्याचे बोलले जात आहे. मात्र, पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांवर राजन साळवी यांनी पत्रकार परिषद घेऊन या चर्चांना पूर्णविराम दिला होता.
मात्र, माध्यमांशी संवाद साधत त्यांनी पक्ष बदलाचे संकेत दिले आहेत. मी योग्यवेळी योग्य निर्णय घेईन, असे स्वत: राजन साळवी यांनी म्हटले आहे. या विधानामुळे उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत.





