MLA Mahesh Sawant : शिंदे सेनेचे माजी आमदार सदा सरवणकर यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. आमदारांना २ कोटी रुपये निधी मिळतो पण मी आमदार नसतानाही मला २० कोटी रुपयांचा निधी मिळतो, असं वक्तव्य आमदार सदा सरवणकरांनी केलं होतं. त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणलं आहे. आता सरवणकरांच्या याच वक्तव्यावरून ठाकरे सेनेच्या एका आमदाराने थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरच तुमच्या नावाने दादागिरी सुरू आहे पण आम्ही पण ‘दादा’गिरीतून आलो आहोत, असं ठणकावून सांगितलं. यामुळे आता राजकारण चांगलंच तापल्याचं चित्र आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील जिल्हा नियोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी पार पडली. याच बैठकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माहीम मतदारसंघाचे आमदार महेश सावंत यांनी माजी आमदार सदा सरवणकरांच्या वक्तव्यावरून आक्रमक भूमिका घेत वरील विधान केलं. याच मुद्यावरून या बैठकीत मोठा गदारोळ झाला. काय म्हणाले आमदार महेश सावंत? माजी आमदारांना तुम्ही खूप निधी दिला आहे, पण कामे झाली नाहीत, त्यांनी तो निधी स्वत:चा विकास करण्यासाठी वापरला आहे, असा गंभीर आरोप महेश सावंत यांनी केला. पुढे ते म्हणाले, साहेब तुम्ही तुमच्या माजी आमदारांना समज द्यावी, त्यांना कानमंत्र द्या, अशी मागणी महेश सावंत यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. आम्हाला निधी द्यावा यासाठी अनेक पत्रके दिली आहेत, याची आठवणही सावंत यांनी यावेळी बोलताना करून दिली. तुमच्या नावाने दादागिरी सुरू आहे पण…. माजी आमदार सदा सरवणकर यांच्या वक्तव्यावर बोलताना आमदार महेश सावंत चांगलेच आक्रमक झाले होते. माजी आमदार बोलत आहे की आम्हाला 20 कोटी रुपयांचा निधी भेटतो आणि आम्हाला निधी मिळत नाही. तुमच्या नावाने दादागिरी सुरू आहे पण आम्ही पण ‘दादा‘गिरीतून आलो आहोत, असं आमदार महेश सावंत म्हणाले. हेही वाचा : Pune District : दावडी येथे महालक्ष्मी मंदिरात धार्मिक उत्साहात घटस्थापना