Pune District : दावडी येथे महालक्ष्मी मंदिरात धार्मिक उत्साहात घटस्थापना

दावडी – नवरात्र महोत्सवाच्या शुभारंभी दावडी (ता. खेड) येथे गावातील प्राचीन महालक्ष्मी मंदिरात मोठ्या धार्मिक उत्साहात घटस्थापना पार पडली. नंदूकाका भदे व माजी पोलीस पाटील तुकाराम गाडगे यांच्या हस्ते पारंपरिक विधीपूर्वक घट बसविण्यात आला.
यावेळी मंदिर परिसर गावातील महिला व तरुणांनी फुलांनी सजवला होता. मंगलमय वातावरणात मंत्रोच्चार, शंखध्वनी व ढोल-ताशांच्या गजरात घटस्थापनेचा सोहळा संपन्न झाला. घटस्थापना होताच ग्रामस्थांनी देवीच्या चरणी आरती, नारळ व फुलांचा नैवेद्य अर्पण केला. नवरात्रोत्सव काळात दर संध्याकाळी आरती व भजनाचा कार्यक्रम होणार असून मोठ्या संख्येने भाविक सहभागी होणार आहेत.
मुलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन तसेच मंदिर परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. शतकांपूर्वी बांधलेले हे महालक्ष्मी मंदिर गावाच्या श्रद्धा, सांस्कृतिक व धार्मिक परंपरेचे केंद्र मानले जाते. नवरात्रात भाविक विशेष भक्तीभावाने येथे गर्दी करतात. यंदाचा उत्सव ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे अधिक उत्साहात पार पडेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
या सोहळ्यास ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नंदूकाका भदे, तुकाराम गाडगे पाटील, पांडुरंग दूंडे, सुरेश म्हसाडे, सदाशिव आमराळे, विलास गावडे, संतोष गाडगे, सतिश तरटे, दत्तात्रय साबळे, राजू मुलाणी, नंदुशेठ बोथरा, अंकुश गव्हाणे, बाळा मांजरे व दत्तात्रय कान्हूरकर आदी मान्यवर उपस्थित होते.





