Milind Narvekar’s post : ठाकरेंचे खासदार फुटीच्या मार्गावर; मिलिंद नार्वेकरांच्या त्या पोस्टने वेधले लक्ष
Milind Narvekar's post : गट स्थापन करण्यासंदर्भातील पत्रही त्यांनी दिल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर शिंदे दिल्लीत दाखल झाल्याने या घडामोडींना आणखी वेग आला आहे.

Milind Narvekar’s post : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत आहेत. याचे कारण म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे अॅापरेशन टायगरद्वारे उबाठा गटाचे खासदार फोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे. या चर्चांना कालपासून अधिक वेग प्राप्त झाला असून तशा मोठ्या राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. उबाठा गटातील सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे. या सहा खासदारांची नावे देखील समोर आली असून, याबाबत लवकरच मोठी बातमी समोर येईल असे सांगण्यात येत आहे.
अशातच आता माजी मुख्यमंत्री आणि उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू मिलिंद नार्वेकर यांनी सोशल मीडियावरील एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे एकीकडे अॅापरेशन टायगर आणि दुसरीकडे नार्वेकरांची पोस्ट याचा नेमका अर्थ काय काढायचा? असा सवाल उपस्थित केला जात आहे. मिलिंद नार्वेकर यांच्या एका सोशल मीडिया पोस्टनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
नार्वेकरांनी काय पोस्ट केली?
16 जून रोजी रात्री उशिरा मिलिंद नार्वेकर यांनी राज्याच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचा फोटो पोस्ट करत त्यांची लोकायुक्त संस्थेच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले. राज्यात राजकीय घडामोडी वेगाने घडत असताना आणि विरोधकांकडून ज्यांच्यावर महाविकास आघाडीत अस्थिरता निर्माण केल्याचे आरोप करण्यात आले होते, त्याच रश्मी शुक्ला यांना नार्वेकर यांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची लोकायुक्त संस्थेच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! pic.twitter.com/09qdAqihHh
— Milind Narvekar (@NarvekarMilind_) June 16, 2026
या पोस्टमागील नेमका संदेश काय, असा प्रश्न उपस्थित केला आहे. काहींनी याबाबत आश्चर्य व्यक्त केले असून सोशल मीडियावरही याची चर्चा रंगली आहे. विरोधी पक्षात असूनही सत्ताधारी नेते किंवा त्यांच्या निकटवर्तीयांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवण्याची नार्वेकरांची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी पंतप्रधानांपासून केंद्रीय गृहमंत्र्यांपर्यंत अनेक मान्यवरांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. मात्र, सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रश्मी शुक्ला यांच्यासाठी केलेली ही पोस्ट विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.
दिल्लीत वेगवान घडामोडी
ठाकरे गटातील सहा खासदार शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजस्थानमध्ये जाऊन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. गट स्थापन करण्यासंदर्भातील पत्रही त्यांनी दिल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर शिंदे दिल्लीत दाखल झाल्याने या घडामोडींना आणखी वेग आला आहे.
Earlier today, following the instructions of our Hon’ble Party President Shri Uddhav Thackeray Saheb I have written to the Honourable Speaker of the Lok Sabha, Shri Om Birla ji: pic.twitter.com/mR55DbHYvx
— Arvind Sawant (@AGSawant) June 16, 2026
उबाठाकडून लोकसभा अध्यक्षांना पत्र
एकीकडे या खासदारांकडून हलचाली सुरु असतानाच दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनंही डॅमेज कंट्रोलसाठी रात्री उशीरापासूनच कंबर कसल्याचे दिसून येत आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी तातडीने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना एक पत्र पाठवले आहे. या पत्राद्वारे त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांना सभागृहात त्यांच्या रीतसर अधिकृत नेते आणि व्हीप यांच्यामार्फत प्रतिनिधित्व करणारा एकच राजकीय पक्ष म्हणून मान्यता कायम ठेवावी, अशी मागणी लोकसभा अध्यक्षांना केली आहे.
महत्वाचे म्हणजे या पत्रात अरविंद सावंत यांनी “पक्षाचे प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कोणत्याही कथित गटाला किंवा फुटीर गटाला कोणतीही वेगळी मान्यता, दर्जा, विशेषाधिकार किंवा सुविधा देऊ नये,” असा उल्लेख केला आहे.
हेही वाचा : Smart Meter : अखंड वीजपुरवठ्याशिवाय स्मार्ट मीटर नको





