पुणे जिल्हा | खेड-आळंदी विधानसभेसाठी ठाकरे गट लढवणार!

शेलपिंपळगाव, (वार्ताहर) – खेड-आळंदी विधानसभेची जागा महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आग्रही असून ही जागा देखील ठाकरे गटाला मिळेल असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी दिले.
खासदार संजय राऊत यांची सामना कार्यालयात जाऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खेड तालुक्यातील पदाधिकारी आणि इच्छुक नेत्यांनी भेट घेतली. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा मतदारसंघ शिवसेनेला कसा अनुकूल आहे याची माहिती सर्वांनी राऊत यांना दिली.
त्याचबरोबर पक्ष संघटना आणि खेड तालुक्यातील शिवसैनिक महाविकास आघाडीतील ही जागा शिवसेनेला मिळावी यासाठी आग्रही असल्याचे उपस्थित नेत्यांनी सांगितले तर निवडणूक लढविण्याचा दृष्टीने सर्वच तयारी झाली असल्याचे जिल्हाप्रमुख अशोक खांडेभराड यांनी सांगितले
तर पक्ष बांधणी करून तालुक्यातील सर्व शिवसैनिक आगामी निवडणुकीसाठी सज्ज झाले असल्याचे तालुकाप्रमुख रामदास धनवटे यांनी सांगितले.
पदाधिकरी म्हणाले की…
खेड-आळंदी विधानसभा निवडणूक ही मशाल याच चिन्हावर वाढवली जावी अशी आग्रही भूमिका अमोल पवार यांनी व्यक्त केली तर इच्छुक असलेले बाबाजी काळे यांनी सांगितले की, इच्छुक उमेदवार जरी आम्ही जास्त असलो तरी आम्ही सर्वचजण एकत्र आहोत,
महायुतीच्या विरोधात आमच्यापैकी कोणताही एक उमेदवार निवडणूक लढवून ही जागा निवडून आणणार असल्याची ग्वाही दिली.
दरम्यान उपजिल्हाप्रमुख शिवाजी वर्पे यांनी कसल्याही परिस्थितीत ही जागा आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळावी यासाठी आपण आग्रह करावा, अशी राऊत यांना विनंती केली.
यावेळी संजय राऊत यांनी देखील विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. यावेळी रामहरी आवटे, सुदामराव बोत्रे, राहुल मलघे उपस्थित होते.
शिवसैनिक एक दिलाने निवडणूक लढवणार
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली असली तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खेड तालुक्यातील सर्वच नेत्यांनी एकत्र येऊन संजय राऊत यांची भेट घेऊन खेड-आळंदीची जागा आम्ही सर्व शिवसैनिक आणि पदाधिकारी एकदिलाने निवडणूक लढणार असल्याची ग्वाही दिल्याचे सूत्रांच्या माहितीनुसार समजले.




