पाचोरा-भडगाव विधानसभेत ठाकरे गटाला धक्का; वैशाली सूर्यवंशी यांचा कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश

पाचोरा : पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला (भाजप) बळ मिळाले आहे. शिवसेना (उबाठा) गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे भाजपच्या स्थानिक पातळीवरील संघटनात्मक ताकद वाढली असून, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
मुंबई येथे आयोजित भव्य प्रवेश सोहळ्यास भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, ज्येष्ठ नेते गिरीश महाजन, राज्याचे मंत्री नितेश राणे, महामंत्री विजय चौधरी आणि पाचोरा-भडगाव विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. वैशाली सूर्यवंशी यांच्या प्रवेशाने पाचोरा-भडगावमधील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपला आगामी निवडणुकांमध्ये मोठा फायदा होईल, असा विश्वास पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केला.
वैशाली सूर्यवंशी यांचे पक्षात स्वागत करताना स्थानिक नेतृत्वाने त्यांच्या सामाजिक कार्याची प्रशंसा केली. “वैशालीताईंच्या प्रवेशाने भाजप अधिक मजबूत होईल. त्यांच्या अनुभवाचा आणि कार्यकर्त्यांच्या जोशाचा पक्षाला निश्चितच फायदा होईल,” असे अमोल शिंदे यांनी सांगितले. या प्रवेश सोहळ्यामुळे पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात भाजपची पकड आणखी दृढ होण्याची अपेक्षा आहे.




