ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर यांच्या अडचणीत वाढ; गुन्हा दाखल

मुंबई – ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर (MLA Ravindra Waikar) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आझाद मैदान पोलीस ठाण्यात (Azad Maidan Police Station) रविंद्र वायकर यांच्यासह इतर पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. जोगेश्वरीमधील सुप्रिमो क्लबच्या (Supremo Club) जागेचा गैरवापर, तसेच हॉटेल बांधताना तथ्य लपवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
मुंबई महापालिकेचे उपअभियंता संतोष मांडवकर (Deputy Engineer of Mumbai Municipal Corporation Santosh Mandavkar) यांच्या तक्रारीवरून आझाद मैदान पोलीस ठाण्यात रविंद्र वायकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवींद्र वायकर, मनीषा वायकर (Manisha Waikar), त्यांचे व्यावसायिक भागीदार आसू नेहलनाई, राज लालचंदानी, पृथ्वीपाल बिंद्रा आणि आर्किटेक्ट अरुण दुबे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) यांनी वायकर यांच्यावर 500 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. वायकर यांनी आपल्या राजकीय ताकदीचा वापर करून बागेसाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर पंचतारांकित हॉटेलच्या बांधकामासाठी बेकायदेशीररीत्या मान्यता घेतल्याचा आरोप केला होता. यानंतर याची प्राथमिक चौकशी सुरू केली होती.




