मुख्यमंत्रिपदाचा चेहरा देण्याविषयी ठाकरे गट आग्रही? संजय राऊत काय म्हणाले, पाहा…

मुंबई – विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा देण्याविषयी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा शरद पवार गट उत्सुक नाही. मात्र, चेहरा पुढे करून निवडणुकीला सामोरे जाण्याबाबत शिवसेनेचा ठाकरे गट आग्रही असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे संबंधित मुद्द्यावरून महाविकास आघाडीतील मतभिन्नता समोर आली आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच दिल्ली दौरा केला. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडीचा चेहरा बनण्याची तयारी असल्याचे संकेत दिल्याची जोरदार चर्चा रंगली. त्याविषयीचे प्रश्न शुक्रवारी दिल्लीत पत्रकारांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना विचारले. त्यावेळी राऊत यांनी महाविकास आघाडीने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार देण्याची गरज अधोरेखित केली.
लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचा चेहरा पुढे केला असता; तर विरोधकांनी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला पराभूत करण्याची किमया करून दाखवली असती. राहुल यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद स्वीकारल्यानंतर देशात काहीसा विश्वास वाढीस लागल्याचे दिसते. त्यामुळे चेहरा गरजेचा आहे, असे ते म्हणाले.
उद्धव मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील का, असे पत्रकारांनी आणखी खोदून विचारले. त्यावर राऊत यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले. लोकसभा निवडणुकीत केवळ राहुल आणि उद्धव विरोधकांचे चेहरे बनल्याचे त्यांनी म्हटले.
त्यातून चेहरा पुढे करून विधानसभा निवडणूक लढवण्याची ठाकरे गटाची इच्छा असल्याचे सूचित झाले. अर्थात, कॉंग्रेस आणि शरद पवार गटाने निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदाविषयी निर्णय घेण्याची भूमिका सातत्याने बोलून दाखवली आहे.





