Thackeray group : तारीख पे तारीख.! ठाकरे गटाची सुनावणी पुन्हा लांबणीवर

Thackeray group – शिवसेना (shivsena) व धनुष्यबाण शिंदे गटाला सोपवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने (Thackeray group) दाखल केलेल्या याचिकेवरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी (Hearing) बुधवारी पुन्हा लांबणीवर पडली.
यामुळे ठाकरे गटाचा पुन्हा एकदा अपेक्षाभंग झाला आहे. सुप्रीम कोर्टातील या सुनावणीवरच शिवसेना ठाकरेंना परत मिळणार किंवा नाही हे स्पष्ट होणार आहे.
सुप्रीम कोर्टाच्या निकालात राजकीय पक्षाचं महत्त्व अधोरेखित असताना आयोगाचा निकाल मात्र त्या तत्वांच्या विरोधात असल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे. त्यामुळे या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह वापरण्याचा अधिकार शिंदे गटाला दिला. त्यानंतर ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती.
सत्तासंघर्षावरील याचिकेवर सुनावणी सुरु असतानाच ही याचिका दाखल झाली होती. पण त्यावर सुनावणी झाली नव्हती. आज देखील या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्णयांविरोधात आज सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होणार होती. पण आता ती पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे ठाकरे गटाला आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.





