अमरावती : पुढील मकरसंक्रांतीपर्यंत उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दिसतील, असे वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केले आहे. रवी राणा यांच्या या विधानामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. राज्याच्या परिवर्तनामध्ये उद्धव ठाकरेंना तिळगूळ खा आणि गोड गोड बोलावे अशी विनंती आहे, असेही रवी राणा यांनी म्हटले.
राज्यात सरकार स्थापन झाल्यापासून भाजप आणि ठाकरे गटाची जवळीक वाढत असल्याचे दिसून येत आहे. विधीमंडळाच्या अधिवेशनादरम्यान उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. तर आदित्य ठाकरे हे देखील आतापर्यंत तीन वेळा देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी गेले होते. शिवाय ठाकरे गटाच्या मुखपत्रामधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करण्यात आले. तसेच उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, असे विधान फडणवीसांनी केले होते.
या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया देताना रवी राण यांनी उपरोक्त मोठा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मोदींचे नेतृत्व उद्धव ठाकरेंनी खुल्या मनाने स्वीकारले तर नक्कीच हे होईल, असा विश्वासही राणा यांनी व्यक्त केला. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात महाराष्ट्र पुढे जाणार आहे. त्यांच्या नेतृत्वात आगामी महापालिका निवडणुकीत भाजपा- युवा स्वाभिमान पक्ष रिंगणात उतरेल. कुठल्याही निवडणुकीत आम्ही एकत्रित राहू असेही आमदार रवी राणा यांनी सांगितले.