Shiv Sena (UBT) : ठाकरे गटाची बैठक; एका आमदाराची दांडी चर्चेत, उद्धव ठाकरेंचं महत्वाचे आवाहन
Shiv Sena (UBT) : या बैठकीला एक आमदार सोडून बाकी सर्व विधानसभा आणि विधानपरिषद सदनातील आमदार उपस्थित होते.

Shiv Sena (UBT) : काल दोन महत्वाच्या राजकीय घडामोडी चर्चेत आहेत. एक म्हणजे शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांच्यात मुंबईतील पंचतारांकित हॅाटेलमध्ये झालेली बैठक.
या बैठकीनंतर शरद पवार गट एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा रंगली. मात्र, या चर्चेवर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत आता कोणताही नवीन पक्ष एनडीएत सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले.
दुसरी महत्वाची राजकीय घडामोड म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची ‘मातोश्री’वर झालेली बैठक. या बैठकीला एक आमदार सोडून बाकी सर्व विधानसभा आणि विधानपरिषद सदनातील आमदार उपस्थित होते. पण त्या एका आमदाराने बैठकीला मारलेली दांडी चर्चेत आहे.
बैठकीत ‘या’ मुद्दांवर चर्चा
- अयोध्येतील श्रीराम मंदिरातील कथित दानपेटी चोरी प्रकरण.
- राज्यव्यापी ‘रामरक्षा आंदोलन’.
- पक्षसंघटना मजबूत करणे.
- एसआयआर मोहीम तसेच सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनातील रणनीती.
- बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात पदाधिकारांची नियुक्ती करणे.
प्रत्येक जिल्ह्यात ‘रामरक्षा आंदोलन’ उभारावे : उद्धव ठाकरे
बैठकीत उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर आंदोलनाची सुरुवात मातोश्रीतून झाली होती, त्याचप्रमाणे श्रीराम मंदिरातील कथित दान चोरीप्रकरणाविरोधातील जनआक्रोशाची ठिणगीही आता मातोश्रीतूनच पडेल, असा निर्धार व्यक्त केला. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने ‘रामरक्षा आंदोलन’ उभारावे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी आमदारांना दिल्या.
पुढील आठवड्यात नागपूरात रामरक्षा आंदोलन
गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईत ठाकरे गटाकडून रामरक्षा आंदोनलास प्रारंभ झाला. आता विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर पुढील आठवड्यात नागपुरात ‘रामरक्षा आंदोलन’ आयोजित करण्यात येणार आहे. या आंदोलनात स्वतः उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत. प्रत्येक आमदाराने आपल्या मतदारसंघात आंदोलनाचे नियोजन करून ते प्रभावीपणे राबवावे, अशा सूचनाही त्यांनी बैठकीत केल्या. तसेच एसआयआर मोहिमेबाबत विशेष सतर्क राहण्याचे आवाहन करताना त्यांनी मतदार यादीतून पक्षाच्या समर्थकांची नावे वगळली जात नाहीत ना, याची प्रत्येक स्तरावर खबरदारी घेण्याचे आवाहन केले.
कोण आहेत डॅा. राहुल पाटील?
ठाकरे गटाच्या बैठकीला आमदार राहुल पाटील काही खाजगी कारणामुळे गैरहजर होते. डॉ. राहुल वेदप्रकाश पाटील हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे परभणी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार असून, ठाकरे गटातील निष्ठावान नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे.
परभणी मतदारसंघातून त्यांनी सलग तिसऱ्यांदा विधानसभेत प्रतिनिधित्व मिळवले आहे. २०१४, २०१९ आणि २०२४ अशा सलग तीन विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी विजयाची हॅट्ट्रिक केली आहे. २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर अनेक आमदारांनी पक्ष सोडला असताना डॉ. राहुल पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी निष्ठा कायम ठेवली.
त्यांच्या या भूमिकेची दखल घेत पक्षाने २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्यावर पुन्हा विश्वास व्यक्त करत उमेदवारी दिली. मतदारांनीही त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना सलग तिसऱ्यांदा विधानसभेत पाठवले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज मातोश्रीवर आमदारांची बैठक संपन्न झाली!
खेळीमेळीच्या वातावरणात राजकीय घडामोडींवर चर्चा झाली!
सर्व काही ठीक ठाक , उत्तम आहे,
चिंता नसावी!
जय महाराष्ट्र! pic.twitter.com/CMV4e7zKsv— Sanjay Raut (@rautsanjay61) July 7, 2026
संजय राऊतांच ट्वीट
मातोश्रीवर आमदारांच्या झालेल्या बैठकीनंतरचा एक फोटो खासदार संजय राऊत यांनी एक्सवरुन शेअर केला आहे. या फोटोत उद्धव ठाकरे आणि त्यांचे आमदार दिसत आहेत. या फोटोसह संजय राऊत यांनी खेळीमेळीच्या वातावरणात राजकीय घडामोडींवर चर्चा झाली! सर्व काही ठीक ठाक , उत्तम आहे, चिंता नसावी! जय महाराष्ट्र! असं लक्ष वेधून घेणारे कॅप्शन दिले आहे.





