Thackeray Brothers : ठाकरे बंधूं एकत्र येणार? मामा चंदू वैद्य यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

मुंबई : राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नाही. राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो. सध्या राज्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे (Thackeray Brothers) एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्याला कारणदेखील तसेच आहे नुकतीच राज ठाकरेंनी (Thackeray Brothers) सिने अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना दिलेली मुलाखत. मुलाखतीत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंशी युती करण्यास तयारी दर्शवली. या मुलाखतीनंतर राज्यात ठाकरे बंधूं एकत्र येणार? अशी चर्चा सुरु झाली. या सगळ्यांवर आता राज आणि उद्धव यांचे मामा चंदू वैद्य यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले चंदू वैद्य ?
मामा चंदू वैद्य म्हणाले मी पहिल्यापासून सांगतोय, दोघे जेव्हा एकत्र येतील तो दिवस राज्यासाठी सुवर्ण दिवस असेल. बाळासाहेब असतानाही मी प्रयत्न केले, परंतु त्यावेळी माझ्या प्रयत्नांना यश आले नाही. आजही माझी इच्छा, दोघांनीही एकत्र यावे, मतभेद विसरून काम करावे, असे म्हणाले. ज्या भावनिक किंवा राजकीय कारणांमुळे दोघांमध्ये दुरावा आला तो मिटलाय का? असे चंदूमामांना विचारले असता, जगात अशक्य गोष्ट काहीही नसते. शेवटी मराठी माणूस आणि महाराष्ट्राचं हित महत्त्वाचं आहे. तोडा फोडा आणि राज्य करा या नीतीला आळा घालायचा असेल तर दोघांनीही एकत्र यायला पाहिजे. तरच मराठी माणूस आणि महाराष्ट्र पुढे जाईल, असे चंदूमामा म्हणाले.
तसेच खरंच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील? असे विचारले असता ते म्हणाले व्हायला कारण आणि न व्हायला उपाय.. अशी गोष्ट आमची आई सांगायची. त्यामुळे सगळ्या गोष्टी शक्य आहेत. फक्त राज बोलला तसं इच्छा पाहिजे. दोघांनी एकत्र येण्याची हीच योग्य वेळ आहे. कालाय तस्म्ये नम: म्हणतात… शेवटी काळ काही गोष्ट ठरवत असतो. शेवटी गरज ही सगळ्यांना असते. महत्त्वाचं म्हणजे मराठी माणूस आणि महाराष्ट्राला गरज आहे. मी दोघांनाही शुभेच्छा देतो.
राज आणि उद्धव दोघे दूर का गेले होते?
राज आणि उद्धव (Thackeray Brothers) वेगळे का झाले होते? याबाबद्दल चंदू मामांना विचारले असता मी लवकरच छोटं पुस्तक लिहिणार आहे. यात सगळ्या गोष्टींचा उल्लेख करणार आहे. बाळासाहेबांच्या स्मारकाचे ज्यावेळी उद्घाटन होईल त्यावेळी हे पुस्तक प्रकाशित करण्याचा माझा प्रयत्न आहे असे ते म्हणाले.





