Pravin Darekar : ठाकरे बंधूंना आता एकमेकांची राजकीय गरज; प्रवीण दरेकरांचा जोरदार टोला

मुंबई : राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नाही. राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो. सध्या राज्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्याला कारणदेखील तसेच आहे नुकतीच राज ठाकरेंनी सिने अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंशी युती करण्यास तयारी दर्शवली. या मुलाखतीनंतर राज्यात ठाकरे बंधूं एकत्र येणार? अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
या सगळ्या घडामोडीवर आता भाजप विधान परिषद गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी ठाकरे बंधूंना जोरदार टोला लगावला आहे. ठाकरे बंधूंना आता एकमेकांची राजकीय गरज निर्माण झाली आहे. म्हणून त्यांचा एकत्र येण्याचा प्रयत्न असू शकतो. तसेच महाराष्ट्राचे हित पाहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार भक्कम आहे, असा टोला भाजप विधान परिषद गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे.
प्रवीण दरेकर पुढे म्हणाले की, महाराष्ट्राचे हित मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार कशा पद्धतीने जपत आहे, हे आपण पाहतोय, विकास गतीने होतोय. आज सकारात्मक बोलणारे संजय राऊत हे काल-परवा काय बोलत होते, हे सर्वांनी पाहिलेय. त्यांचे कुठलेही वक्तव्य स्थिर नसते, त्यामुळे ते गांभीर्याने घेण्याची गरज वाटत नाही, असा प्रवीण दरेकर यांनी म्हटले.
दोघे भाऊ एकत्र येणे मराठी मनाला आवडेल : सुषमा अंधारे
महाराष्ट्राची अस्मिता जोपासण्यासाठी हे दोघे भाऊ एकत्र येत असतील तर महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी मनाला ते आवडेल. स्वतंत्र अस्मितेसाठी ते एकत्रित येणार की भाजपचे मांडलिकत्व पत्करण्यासाठी एकत्र येणार हेदेखील महत्त्वाचे आहे. राज यांना यासंदर्भात प्रश्न विचारायला हवे होते, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली.
मराठी म्हणून सगळ्या शक्ती एकत्र येणे गरजेचे : अंबादास दानवे
उद्धव आणि राज एकत्र येण्याच्या विषयावर महाराष्ट्र चर्चा करत असेल, परंतु राजकीय विषय स्वतंत्र आहेत. उद्धव ठाकरे यांच्या संघटनेला कायम त्रास होईल, अशाच पद्धतीने राज यांनी वारंवार भूमिका घेतली आहे. मात्र मराठी माणूस म्हणून सगळ्या शक्ती एकत्र येणे गरजेचे आहे, असे मत अंबादास दानवे यांनी व्यक्त केले.





