‘या’ शिक्षकांनाही आता ‘टीईटी’ अनिवार्य

पुणे – आदिवासी आश्रमशाळांमधील रोजंदारी, तासिका तत्वावरील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना शासनसेवेत नियमित सामावून घेण्यात येणार आहे. त्यांचे नियमितीकरण केल्याच्या दिनांकापासून पाच वर्षांच्या कालावधीत त्यांना शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आले आहे. अन्यथा शासनाकडून त्यांच्या सेवा समाप्त करण्यात येणार आहेत.
आदिवासी विकास विभागाअंतर्गत 499 आश्रमशाळा आहेत. सध्या शिक्षक संवर्गातील 6 हजार 209 पदे मंजूर असून 4 हजार 6 पदे भरलेली, तर उर्वरित रिक्त आहेत. वर्ग 4 च्या 6 हजार 100 मंजूर पदांपैकी 3,237 पदे भरलेली, उर्वरित 2,863 पदे रिक्त आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून विषयनिहाय आवश्यकतेप्रमाणे तासिका तत्त्वाने मानधनावर 3 हजार 833 शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी नियुक्त आहेत. यातील 365 कर्मचाऱ्यांनी 46 याचिका विविध न्यायालयांत दाखल केल्या होत्या. दरम्यान, दहा वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेल्या याचिकाकर्त्यांच्या सेवा नियमित करण्याबाबतचे आदेश न्यायालयाना दिले होते.





