Pune: शिक्षकांची नियुक्ती करताना सावध पवित्रा

पुणे – राज्यातील टीईटी घोटाळ्यानंतर जिल्हा परिषदेने शिक्षकांची नियुक्त करताना सावध पवित्रा घेतला आहे. जिल्हा परिषदेकडे नव्याने नियुक्त होणार्या 181 प्राथमिक शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची थेट सायबर सेलकडून पडताळणी करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर या शिक्षकांना नियुक्तीचे आदेश दिले जाणार आहे.
शिक्षक भरती प्रक्रियेत पुणे जिल्हा परिषदेला 181 नवे शिक्षक मिळाले. त्यापैकी 171 शिक्षकांना जिल्हा परिषदेकडून समुपदेशन झाले असून तीन जण कागदपत्र तपासणीला तर सात जण उपस्थित राहिले नाहीत. लोकसभा निवडणूकीच्या अगोदर ही प्रक्रिया पूर्ण झाली असताना अद्यापही या शिक्षकांना नियुक्ती आदेश मिळालेले नाहीत.
नियुक्त होणार्या सर्व शिक्षकांची पोलिस पडताळणीसह समांतर आरक्षणाची देखील पडताळणी केली जात आहे. या प्रक्रियेला वेळ लागत आहे. आतापर्यंत 174 पैकी 22 उमेदवारांची चारित्र पडातळणी अहवाल जिल्हा परिषदेला मिळालेले नाहीत. भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, माजी सैनिक या आरक्षणाची माहिती त्या-त्या विभागांकडून मागवली आहे, तसे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून उमेदवारांना आणि विभागांना ई-मेल देखील करण्यात आले असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
पुण्यासाठी 274 शिक्षकांची मागणी करण्यात आली होती. शासनाकडून 181 शिक्षक देण्यात आले आहेत. आतापर्यंत 149 उमेदवारांचे चारित्र पडताळणी झाली असून 22 बाकी आहेत. सर्व प्रक्रिया बघता दहा जून पर्यंत सर्व उमेदवारांना नियुक्ती आदेश दिले जाणार आहे. त्यापूर्वी सायबर सेलकडून प्रमाणपत्र पडताळणीचे नाहरकत प्रमाणपत्र मिळणे आवश्यक आहे, त्यानंतरच नियुक्ती आदेशची प्रक्रिया होणार असल्याचेही सांगण्यात आले.
“टीईटी, सीईटी आणि अभियोग्यता आणि बुद्धीमापन चाचणीच्या प्रमाणपत्रांचे अनुक्रमांक सायबरसेलला कळविण्यात येणार आहेत. त्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यांच्याकडून ना-हरकत प्रमाणपत्र मिळणार आहे.” – संजय नाईकडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प.




