प्रभात वृत्तसेवा पुणे – सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार शिक्षक सेवेत येऊ इच्छिणाऱ्या नव्या उमेदवारांसह सेवेत कार्यरत राहू इच्छिणारे शिक्षक, पदोन्नतीसाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण अनिवार्य आहे, राज्य परीक्षा परिषदेने समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) पदासाठी जाहीर केलेल्या विभागीय परीक्षेच्या पात्रतेमध्येही टीईटी उत्तीर्ण असणे बंधनकारक असल्याने यावर्षी टीईटी परीक्षा देणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (टीईटी) यावर्षी सुमारे ४ लाख ७५ हजार उमेदवारांची नोंदणी झाली असून गेल्या वर्षी झालेल्या टीईटी परीक्षेच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टीईटीसाठी सुमारे १ लाख १७ हजारांनी नोंदणीत वाढ झाली आहे. सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व मंडळांच्या, सर्व माध्यमांच्या अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळांमध्ये पहिली ते आठवी इयत्तांच्या शिक्षणसेवक, शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. परीक्षा परिषदेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार २३ नोव्हेंबरला टीईटी परीक्षा राज्यभरात होत आहे. पहिली ते पाचवी या इयत्तांसाठीचा पेपर-१ सकाळी, तर सहावी ते आठवी या इयत्तांसाठीचा पेपर-२ दोन दुपार होणार आहे.या परीक्षेच्या नोंदणीसाठी १५ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. राज्यातील अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे काही उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरण्यात अडचणी आल्याने परीक्षा परिषदेने अर्ज भरण्यासाठी ९ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. गेल्या वर्षी या परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी बायोमेट्रिक, फेस रेकग्निशन, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सीसीटीव्ही कॅमेरे अशा उपाययोजना करण्यात आल्या होत्या.