मुंबई मॅरेथॉनसाठी चाचपणी जानेवारीअखेर किंवा फेब्रुवारीत शक्य

पुणे – भारतीय मॅरेथॉनमध्ये अत्यंत मानाची समजली जात असलेली मुंबई मॅरेथॉन आयोजित करण्यासाठी चाचपणी सुरू झाली आहे. एकीकडे करोनाचा धोका अद्याप कायम असताना या स्पर्धेत दिल्लीला झालेल्या अर्धमॅरेथॉनचे नियम लावले जाण्याची व केवळ स्पर्धकांनाच प्रवेश देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सुरुवातीला राज्य सरकारनेच या स्पर्धेला परवानगी नाकारली होती त्यामुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. आता ही स्पर्धा पुढील काही दिवसांत सरकारने परवानगी देण्याच्या बाजूने भूमिका घेतली तर जानेवारीअखेर किंवा फेब्रुवारीत ही स्पर्धा होण्याची शक्यता आहे. सरकारी स्तरावर याबाबत कोणीही प्रतिक्रिया देण्यास तयार नसले तरीही स्पर्धेसाठी जोरदार फिल्डिंग लावली जात असल्याचे संकेत मात्र मिळत आहेत.
दरवर्षी जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या रविवारी होणारी मुंबई मॅरेथॉन 17 जानेवारी 2021 रोजी होणे अपेक्षित होते. मात्र, यंदा मुंबई मॅरेथॉनचा मुहूर्त 17 वर्षांनंतर प्रथमच लांबण्याचीही चिन्हे दिसत असली तरीही त्यासाठी प्रयत्न मात्र, सोडण्यात आलेले नाहीत.
करोनामुळे देशातील सर्वच क्रीडा स्पर्धा रद्द झाल्याने मुंबई मॅरेथॉनच्या आयोजनाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. मात्र, राजधानी दिल्लीत करोनाबाधितांची संख्या वाढत असूनही नोव्हेंबरमध्ये दिल्ली अर्धमॅरेथॉन शर्यत पार पडल्याने मुंबई मॅरेथॉनसाठीही आयोजक सरसावले आहेत. अर्थात, या स्पर्धेत दिल्ली अर्धमॅरेथॉनच्या धर्तीवर केवळ व्यावसायिक धावपटूंसाठीच मुंबई मॅरेथॉन रंगणार असल्याची माहिती मिळत आहे.





