Test Cricket | भारत-द.आफ्रिका यांच्यात होऊ शकते WTC फायनल 2025, जाणून घ्या संपूर्ण समीकरण…

WTC Final 2025 Equation (IND vs SA) : सध्या भारतीय संघ बॉर्डर गावस्कर करंडक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. आतापर्यंत झालेल्या दोन सामन्यांमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियाने 1-1 असा विजय मिळवला आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेने घरच्या भूमीवर श्रीलंकेविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका जिंकली आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले.
दक्षिण आफ्रिका अव्वल स्थानी पोहोचल्यानंतर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची शर्यत आणखीनच रंजक बनली आहे. तथापि, भारत आणि दक्षिण आफ्रिका 2025 मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पोहोचू शकतात. अशा स्थितीत समीकरण काय म्हणतं ते जाणून घेऊया.
वास्तविक, भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी 3 सामने जिंकणे आवश्यक आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये एकूण 3 सामने बाकी आहेत. भारतीय संघाने तिन्ही सामने जिंकल्यास जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत संघाचे स्थान निश्चित होईल. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचे तिकीट मिळवण्यासाठी फक्त एक सामना जिंकावा लागेल.
दक्षिण आफ्रिकेला पाकिस्तानविरुद्ध आगामी 2 कसोटी सामन्यांची मालिका घरच्या भूमीवर खेळायची आहे. अशा स्थितीत आफ्रिका पाकिस्तानला एका सामन्यात सहज पराभूत करेल, असे मानले जात आहे. या समीकरणामुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठू शकतात. दुसरीकडे, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या उर्वरित 3 पैकी एका सामन्यातही ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला तर ऑस्ट्रेलियाची अंतिम फेरीत दाखल होण्याची शक्यता जास्त असेल.
भारताने दोनदा गाठली आहे अंतिम फेरी…
भारतीय संघ दोन वेळा जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. 2021 मध्ये प्रथमच विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने आपले स्थान निश्चित केले होते. मात्र, न्यूझीलंडपुढे भारताला गुडघे टेकावे लागले. 2023 मध्येही भारत आणि ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले होते. त्यावेळी ऑस्ट्रेलियाने भारताला हरवून विजेतेपद पटकावले. मात्र, यावेळी अंतिम फेरीत पोहचण्याचा भारताचा मार्ग थोडा खडतर झाला आहे.
दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिका या वर्षी टी-20 विश्वचषक 2024 च्या फायनलमध्येही आमने-सामने आले होते. भारताने थरारक अशा सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून विजेतेपदावर कब्जा केला होता.





