लाहोर : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात किमान 34 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली असून सुरक्षा दलांवरील एक मोठा हल्ल्याचा कट उधळण्यात आला आहे. पंजाब प्रांतातील सुरक्षा दलांनी प्रसिद्धीस दिलेल्या एका निवेदनात ही माहिती दिली आहे. अटक करण्यात आलेले बहुतेक दहशतवादी हे तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) चे सदस्य असून यापैकी तिघे सर्वात धोकादायक दहशतवाद्यांच्या यादीतले आहेत, असे काऊंटर टेरेरिझम डिपार्टमेंटने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. पंजाब प्रांतातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवड्यात गोपनीय माहितीच्या आधारे ४१५ कारवाई करण्यात आली आणि ३४ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. या सर्वांना लाहोर, रावळपिंडी, गुजरांवाला, झेलम, बहावलपूर, साहिवाल, नारोवाल, झेलम, पाकपट्टन, बहावलनगर, बुखारा, कसूर आणि ननकाना साहिब येथून अटक करण्यात आली. या दहशतवाद्यांनी प्रांतातील सुरक्षा दले आणि महत्वाच्या इमारतींना लक्ष्य करण्याचा कट केला होता. त्यांचा कट उधळून लावण्यात आला आहे, या दहशतवाद्यांकडून ५,८४१ ग्रॅम स्फोटके, १९ डेटोनेटर्स, ५१ फूट सेफ्टी फ्यूज वायर, हातबॉम्ब आणि बंदी घातलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे, असे निवेदनात म्हटले आहे.