पाकिस्तानात दहशतवादी संघटना करणार शक्ती प्रदर्शन

इस्लामाबाद: भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर (Operation Sindoor) पाकिस्तानमधील जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammed) आणि लश्कर-ए-तैयबा (Lashkar-e-Taiba) यांसारख्या प्रमुख दहशतवादी संघटना हादरल्या होत्या. भारतीय हल्ल्यात उद्ध्वस्त झालेले हे दहशतवादी तळ पुन्हा उभे राहण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर प्रथमच, दहशतवादी संघटना लश्कर-ए-तैयबा पाकिस्तानमध्ये एका भव्य जाहीर सभेच्या माध्यमातून आपली ताकद दाखवणार आहे.
मुख्यालय उद्ध्वस्त झाल्यावर आता शक्तीप्रदर्शन
‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारताने लश्करचे मुख्यालय जमीनदोस्त केले होते. भारताच्या या हल्ल्यात उद्ध्वस्त झाल्यानंतर लश्कर या मोठ्या जाहीर सभेच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपले बळ सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. या कारवाईत पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळ क्षेपणास्त्र हल्ल्यात नष्ट झाले होते आणि यात किमान १०० दहशतवादी मारले गेले होते. यानंतर दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात पाकिस्तानी लष्करही सहभागी झाले होते.
सैफुल्ला कसूरी बनेल सभेचा चेहरा
पाकिस्तान लष्करासोबत दहशतवाद्यांना खांदा देणारा एक कुख्यात दहशतवादी या रॅलीचा चेहरा बनणार आहे. लश्करने सभेसाठी जारी केलेल्या पोस्टरवर पहलगाम हल्ल्यानंतर चर्चेत आलेल्या दहशतवादी सैफुल्ला कसूरीचा (Saifullah Kasuri) फोटो आहे. सूत्रांनुसार, या रॅलीत हाफिज सईदचा (Hafiz Saeed) संदेश वाचून दाखवला जाईल. जिहादींना एकत्र आणण्यासाठी ही मोठी तयारी मानली जात आहे, ज्यात सैफुल्ला कसूरीला मुख्य चेहरा बनवले जाण्याची चर्चा आहे.
२ नोव्हेंबरला लाहोरमध्ये रॅली; भारतीय गुप्तचर यंत्रणांची नजर
लश्कर-ए-तैयबाची ही रॅली येत्या २ नोव्हेंबर रोजी लाहोरमधील मिनार-ए-पाकिस्तान येथे होणार आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान चर्चेत आलेल्या दहशतवादी हाफिज अब्दुल रऊफने (Hafiz Abdul Rauf) जास्तीत जास्त गर्दी जमवण्याचे आवाहन केले आहे. २ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या लाहोरमधील या सभेवर भारतीय गुप्तचर यंत्रणांची (Indian Intelligence Agencies) करडी नजर असेल. सूत्रांनुसार, या रॅलीत भारताला हवे असलेले लश्करचे सर्व प्रमुख दहशतवादी सहभागी होणार आहेत.
पाक लष्कराचा लश्करला पुन्हा उभे करण्याचा प्रयत्न
सूत्रांच्या माहितीनुसार, या रॅलीच्या माध्यमातून लश्कर-ए-तैयबाला नव्याने उभे करण्याचा प्रयत्न आहे. पाकिस्तानी लष्कर या संदर्भात योजना आखत आहे. लश्करच्या या दहशतवाद्यांना फक्त भारताच्या विरोधातच नव्हे, तर खैबर पख्तूनख्वामध्ये (Khyber Pakhtunkhwa) टीटीपीच्या (TTP) विरोधात पाकिस्तानी लष्कर तैनात करू इच्छित आहे, असे बोलले जात आहे. ही रॅली लश्कर-ए-तैयबाच्या राजकीय शाखा असलेल्या पाकिस्तान मरकझी मुस्लिम लीग (PMML) या बॅनरखाली आयोजित करण्यात आली आहे.





