श्रीनगर – जम्मू-काश्मीरमधील चकमकीत शनिवारी सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला ठार केले. त्या चकमकीत दोन सुरक्षा जवान जखमी झाले. सुदैवाने त्यांच्या प्रकृतीला कुठला धोका नसल्याचे समजते. बारामुल्ला जिल्ह्यात एका ठिकाणी दहशतवाद्यांचे अस्तित्व असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. त्यानंतर दहशतवाद्यांच्या शोधासाठी मोहीम हाती घेण्यात आली.
त्या मोहिमेवेळी सुरक्षा जवानांना पाहून दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला जवानांनी प्रत्युत्तर दिल्याने दोन्ही बाजूंमध्ये चकमक झडली. त्यामध्ये एक दहशतवादी मारला गेला. जखमी जवानांना उपचारासाठी तातडीने नजीकच्या रूग्णालयात हलवण्यात आले. ठार झालेल्या दहशतवाद्याचे साथीदार संबंधित परिसरात दडल्याची शक्यता वर्तवण्यात आली. त्यांच्या शोधासाठी सुरक्षा दलांनी आपली मोहीम कायम ठेवली.