दहशतवादी हल्ले तर, नीट परिक्षेतील घोटाळा…; मोदी सरकारचा पहिला आठवडा कसा राहिला, पाहा…

Modi government | Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ जून रोजी शपथ घेतली आणि त्यांचा तिसरा कार्यकाळ सुरू झाला. पहिल्याच आठवड्यात सरकारला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. काही घटना परदेशात घडल्या तरी काही देशामध्ये. त्यामुळे सरकारची कोंडी झाली. एवढेच काय तर भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरही सरकारला बॅकफुटवर जाणे भाग पडले.
निवडणूक निकाल जाहीर झाल्यावर सरकारवर केवळ विरोधी पक्षांनीच टीका केली नाही, तर भारतीय जनता पार्टीची पितृ संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्याची सुरूवात सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानाने झाली. आपले मूल्य कायम ठेवले पाहिजे अशी टिप्पणी त्यांनी केली आणि निवडणूक प्रचारातील दर्जाबाबतही भाष्य केले.
वातावरण अगदी विखारी झाले होते अशा आशयाची टिप्पणीही त्यांनी केली. त्यानंतर संघाच्याच इंद्रेश कुमार आणि नंतर रतन शारदा यांनीही भाजपला घरचा आहेर दिला. यातील महत्वाचे होते मोहन भागवत यांचे विधान. ते जे काही बोलले त्याचा संदर्भ थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जोडला गेला. त्यांनी मणिपूरचा मुद्दाही उपस्थित करत सरकारची अडचण केली. एकीकडे विरोधी पक्ष जनादेश हा भाजपच्या सरकारच्या विरोधात असल्याचा दावा करत असतानाच स्वकियांनी केलेल्या टीकेचाही मोदींना सामना करावा लागला.
९ जूनच्या शपथविधीनंतर रियासी, कठुआ आणि डोडा येथे सलग तीन दिवस दहशतवादी हल्ले झाले आणि चकमकी सुरू होत्या. जम्मू काश्मीरमधून दहशतवादाचा सफाया करण्यात आल्याचा दावा केल्यानंतर हे हल्ले झाल्यामुळे सरकारला ते ताप निर्माण करणारे ठरले.
नीट परिक्षेतील घोटाळ्याच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांसोबतच विद्यार्थ्यांच्या रोषाचाही सरकारला सामना करावा लागला.
पेपर लीक झालेले नाही आणि भ्रष्टाचाराचा कोणताही मुद्दा समोर आला नसल्याचे दावे सरकारकडून करण्यात आले. मात्र तरीही हा गोंधळ अद्याप सुरूच आहे. कॉंग्रेसने या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांचा संताप शांत करणे सरकारसाठी जिकरीचे ठरणार आहे.
कुवेतमध्ये भारतीय कामगार राहत असलेल्या इमारतीला लागलेल्या आगीत अनेक कामगारांचा मृत्यू झाला. आपल्या पोटापाण्यासाठी परदेशात जाणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षेबाबतच त्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले. आता केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी गुजरात सरकारद्वारे एका अमेरिकी कंपनीला दिल्या जात असलेल्या सबसिडीबद्दल सवाल उपस्थित करून गदारोळ माजवला आहे.
विरोधी पक्षांनाही नवा मुद्दा मिळाला आहे. उत्तर प्रदेशातील भाजपच्या मंत्रिमंडळात समावेश असलेल्या ओमप्रकाश राजभर या नेत्यानेही जाहीर विधान करून लोकसभेतील पराभवाचे खापर मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर फोडण्याचा प्रयत्न केला. त्यांना तंबी देण्यात आली आहे. तथापि, आपल्या व्हिडिओत फेरफार केला गेल्याचा दावा त्यांनी केला आहे. भाजपला उर्वरीत पूर्ण टर्म मित्रपक्षांना सांभाळतच सरकार चालवावे लागणार असल्यचे पहिल्याच आठवड्यात सूचित झाले आहे.





