काश्मीरमध्ये यात्रेकरुंच्या बसवर दहशतवादी हल्ला; बस दरीत कोसळून ९ भाविकांचा मृत्यू, ३३ जण जखमी

जम्मू – जम्मू आणि काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात रविवारी संध्याकाळी उत्तर प्रदेशातील यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याने नऊ जण ठार झाले, तर 33 जण जखमी झाले.
रियासी जिल्ह्यातील शिवखोडी येथे जात असताना बसवर बेछूट गोळीबार करत दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्याचवेळी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस दरीत कोसळली.
रियासी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विशेष महाजन यांनी या दुर्घटनेची पुष्टी केली आहे. ते म्हणाले, बस दरीत कोसळून ९ जणांचा मृत्यू झाला आहे. काही दहशतवाद्यांनी या बसवर हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे.
यात्रेकरुंची ही बस शिव खोडी मंदिरात दर्शनासाठी जात होती. ही बस पोनी येथील तेरियात गावातून निघाली होती. बसमधील बहुसंख्य भाविक हे मूळचे याच गावचे रहिवासी आहेत. या हल्ला आणि दुर्घटनेत ९ भाविकांनी आपला जीव गमावला आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी बचाव मोहीम हाती घेतली आहे. लष्कर आणि निमलष्करी दलाच्या तुकड्यादेखील तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
लष्करी तुकड्यांनी देखील मदतकार्य सुरू केले आहे. तसेच या परिसरात बंदोबस्त वाढवला आहे. लष्कराने या परिसरात हल्लेखोरांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.





