Hinjewadi | हिंजवडीतील आयटी कंपनीवर ‘अतिरेकी हल्ला’? ; एनएसजी मॉकड्रिलमुळे गोंधळ..

प्रभात वृत्तसेवा
हिंजवडी – हिंजवडी आयटी पार्कमधील इन्फोसिस कंपनीत बुधवारी (दि. ६) दुपारी अचानक राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दल (एनएसजी) कमांडो, गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांचे पथक दाखल झाले. बंदोबस्त वाढलेला पाहून काही वेळातच परिसरात अतिरेकी हल्ल्याच्या अफवा पसरल्या आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, ही घटना केवळ सुरक्षा कवच तपासणीसाठी आयोजित मॉकड्रिल असल्याचे स्पष्ट होताच नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
दुपारच्या सुमारास इन्फोसिस कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारावर एनएसजी कमांडोंच्या गाड्या पोहोचल्या. जवानांकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रे होती आणि त्यांनी परिसराची वेढा घालत तपासणी सुरू केली. यावेळी स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेचे अधिकारीही सोबत होते. तासभर चाललेल्या या हालचालींमुळे कर्मचार्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला.घटनास्थळी धाव घेतलेल्या कर्मचाऱ्यांनी घाबरून आपापल्या कुटुंबीयांना फोन केले. काहींनी थेट सोशल मीडियावर “हिंजवडीत अतिरेकी हल्ला?” अशा आशयाच्या पोस्ट्स टाकल्या. काही पालकांनी कंपन्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. हे सर्व घडत असतानाच कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारावर नागरिक आणि कर्मचारी यांची गर्दी वाढली, त्यामुळे परिस्थिती अधिकच गोंधळाची झाली.
सुदैवाने काही वेळातच पोलिसांनी हे मॉकड्रिल असल्याचे जाहीर केले आणि कोणत्याही प्रकारचा अतिरेकी किंवा सुरक्षेचा धोका नसल्याचे स्पष्ट केले. हे मॉकड्रिल अत्यंत गुप्ततेने आणि वास्तवात घडावी अशीच आखणी करून राबवण्यात आले होते. अशा मॉकड्रिलच्या माध्यमातून कंपन्यांची सुरक्षा, पोलिसांची तत्परता आणि आपत्कालीन परिस्थितीतील प्रतिसाद यांची चाचपणी केली जाते.या साऱ्या घटनेनंतर आयटी कंपन्यांमधील सुरक्षेचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. अशा मॉकड्रिल्समुळे कोणतीही संभाव्य धोक्याची तयारी ठेवता येते, असेही सुरक्षा अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. नागरिकांनी अशा घटनांबाबत भीती न बाळगता अधिकृत माहितीचीच वाट पाहावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
अखंड सावधानता असावी..
जगभरात ठिकठिकाणी अतिरेकी हल्ले होत असतात. त्या पाश्र्वभूमीवर ज्या ठिकाणी आर्थिक केंद्र आणि जादा मनुष्यबळ असते, अशी ठिकाणे अतिरेकी टार्गेट करतात. अनेक आयटी कंपन्या हिंजवडी आणि आसपासच्या परिसरात असल्याने हे ठिकाण जगाच्या नकाशावर आले आहे. पुणे जिल्हयामध्येही लष्कराची अनेक ठिकाणे व दारूगोळा तयार करणारे कारखाने आहेत. त्यामुळे पुण्याचे महत्व अधोरेखित होत आहे. त्या पाश्र्वभूमीवर मॉकड्रिलला अधिक महत्व प्राप्त झाले आहे.
“इन्फोसिस परिसरात आज सुरू असलेली कारवाई नियोजित ‘मॉकड्रिल’ होती. अशा सरावांद्वारे अतिरेकी हल्ल्यासारख्या आपत्कालीन प्रसंगांमध्ये पोलिस, सुरक्षा यंत्रणा आणि कंपनी व्यवस्थापन यांच्यातील समन्वय तपासला जातो. नागरिकांनी घाबरू नये. ही केवळ सुरक्षा चाचणी होती,”
– विशाल गायकवाड, पोलीस उपायुक्त, पिंपरी- चिंचवड





