वाहने थांबवली, ओळख विचारली अन् 23 जणांना गोळ्या घातल्या ; पाकिस्तानमध्ये मोठा दहशतवादी हल्ला

Terrorist Attack in Pakistan । पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये दहशतवाद्यांनी 23 जणांची निर्घृण हत्या केल्याची माहिती समोर येत आहे. आज सकाळी नैऋत्य पाकिस्तानमध्ये, बंदूकधाऱ्यांनी 23 जणांना जबरदस्तीने त्यांच्या वाहनांमधून बाहेर काढून त्यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात सर्वांचा मृत्यू झाला. एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, बलुचिस्तान प्रांतातील मुसाखेल जिल्ह्यात दहशतवाद्यांनी अनेक बस, ट्रक आणि व्हॅन रोखल्या. दहशतवाद्यांनी जात ओळखून लोकांना गोळ्या घातल्या. या घटनेत पाच जण गंभीर जखमीही झालेत.
मुसाखेलचे वरिष्ठ अधिकारी नजीबुल्ला काकर यांनी याविषयी माहिती दिली. दहशतवाद्यांनी पंजाबला बलुचिस्तानशी जोडणाऱ्या महामार्गावर अनेक बस, ट्रक आणि व्हॅन थांबवल्या. यादरम्यान 23 जणांचा मृत्यू झाला, तर 5 जण जखमी झाले. पंजाबमधून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात आली आणि पंजाबमधून येणाऱ्या लोकांची ओळख पटवून त्यांना गोळ्या घालण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
10 वाहनांना आग Terrorist Attack in Pakistan ।
पाकिस्तानी वृत्तपत्रानुसार, सहाय्यक आयुक्त नजीब काकर यांनी सांगितले की, सशस्त्र लोकांनी मुसाखेल येथे महामार्ग रोखला आणि प्रवाशांना खाली उतरवले. त्यांनी 10 वाहनेही पेटवून दिली.
‘दहशतवाद्यांना अन् त्यांच्या मदतनीसांची सुटका नाही Terrorist Attack in Pakistan ।
या घटनेनंतर बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांनी निवेदन जारी केले आहे. या दहशतवादी घटनेचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला. निवेदनानुसार, त्यांनी दहशतवाद्यांच्या भ्याड कृत्यात मारल्या गेलेल्यांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, दहशतवादी आणि त्यांना मदत करणाऱ्यांना सोडले जाणार नाही. बलुचिस्तान सरकार दोषींना शिक्षा देत राहील.
पाकिस्तानच्या पंजाब सरकारच्या प्रवक्त्या आजमा बुखारी यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला. हिंसाचाराचे हे विदारक उदाहरण असल्याचे ते म्हणाले. या हल्ल्याचा नमुना 4 महिन्यांपूर्वी झालेल्या हिंसाचारासारखाच होता. डॉनच्या वृत्तानुसार, एप्रिलमध्ये झालेल्या हल्ल्यात नऊ प्रवाशांना जबरदस्तीने बसमधून खाली उतरवण्यात आले आणि ओळख पटल्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली.





