Terrorist attack in Manipur : मणिपूरमध्ये दहशतवाद्यांचा हल्ला; आसाम रायफल्सच्या २ जवानांना वीरमरण
मणिपूरमध्ये सोमवारी दहशतवाद्यांनी आसाम रायफल्स या निमलष्करी दलाच्या वाहन ताफ्याला लक्ष्य केले. त्या हल्ल्यात २ जवानांना वीरमरण आले.

Terrorist attack in Manipur – मणिपूरमध्ये सोमवारी दहशतवाद्यांनी आसाम रायफल्स या निमलष्करी दलाच्या वाहन ताफ्याला लक्ष्य केले. त्या हल्ल्यात २ जवानांना वीरमरण आले. तर, काही जवान जखमी झाले. संबंधित घटना उखरूल जिल्ह्यात घडली.
डोंगराळ भागात दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी दुपारच्या सुमारास अचानकपणे हल्ला चढवला. त्यांनी आसाम रायफल्सच्या ताफ्यावर अंदाधुंद गोळीबार केला. दहशतवाद्यांचे लक्ष्य ठरलेल्या ताफ्यातून सुमारे ४० जवान प्रवास करत होते.
संबंधित हल्ल्याचा मणिपूर सरकारने तीव्र शब्दांत निषेध केला. सुरक्षा दले आवश्यक ती सर्व पाऊले उचलून हल्ल्याचा हिशेब चुकता करतील. हल्लेखोरांना कठोर प्रत्युत्तर मिळेल, असा विश्वासही राज्य सरकारने व्यक्त केला.
मणिपूरमध्ये तीन वर्षांपूर्वी (मे २०२३) वांशिक संघर्षाची ठिणगी पडली. त्यातून प्रदीर्घ काळ हिंसाचाराच्या घटना घडल्या. त्यामध्ये २६० जण मृत्युमुखी पडले.
त्याशिवाय, हजारों लोक बेघर झाले. त्यामुळे अशांत स्थिती अनुभवणाऱ्या मणिपूरमध्ये शांतता आणि सलोखा निर्माण करण्यासाठी विविध पाऊले उचलण्यात आली.
सुरक्षा दलांकडूनही संवेदनशील भागांत कुठल्या अनुचित घटना घडू नयेत यासाठी नियमित गस्त, शोधमोहिमा सुरू करण्यात आल्या. तशाच मोहिमेवर असणाऱ्या आसाम रायफल्सच्या ताफ्याला दहशतवाद्यांनी लक्ष्य केल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली.




