Pakistan News : इम्रान खान यांच्या पक्षाच्या ३५० नेत्यांवर दहशतवादाचे गुन्हे

लाहोर – इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ पक्षाच्या सुमारे ३५० नेत्यांवर दहशतवाद आणि इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पंजाब पोलिसांकडून गुन्हे दाखल झालेल्या नेत्यांमध्ये खैबर पख्तुनख्वा प्रांताचे मुख्यमंत्री अली आमिन गंदापूर यांचाही समावेश आहे.
या सर्वांवर गेल्या शनिवारी लाहोरमध्ये झालेल्या सभेदरम्यान पोलिसांवर झालेल्या हल्ल्यात कथित सहभागाबद्दल दहशतवादविरोधी आणि खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या नेत्यांच्या अटकेसाठी त्यांच्या निवासस्थानांवर छापे टाकण्यास सुरुवात केली आहे.
गंदापूर यांच्यावर प्लाझाची तोडफोड, खिडक्या फोडणे आणि सीसीटीव्ही कॅमेरे फोडल्याचाही आरोप आहे. लाहोरच्या रॅलीतील फरार नेता हम्माद अझहरला पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी अन्य वरिष्ठ नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री गंदापूर यांना रॅलीच्या बहाण्याने पंजाबमध्ये हल्ला करायचा होता.
याला आपण अजिबात परवानगी देणार नाही, असे पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी बुधवारी सांगितले. पंजाब प्रांतात हिंसाचार घडवण्यापेक्षा आणि विनाशाचे राजकारण न करता लोकांच्या हितासाठी गंदापूर यांनी स्वतःत्या प्रांतावर लक्ष केद्रीत करावे, अशी सूचनाही मरियम नवाज यांनी गंदापूर यांना केली आहे.
शनिवारी लाहोरमध्ये पोलिसांनी कडक बंदोबस्त आणि शहरात नाकाबंदी केली असतानाही इम्रान खान यांच्या समर्थकांनी यशस्वीपणे शक्तिप्रदर्शन केले होते. वेळेची मर्यादा ओलांडल्याबद्दल पोलिसांनी सभेच्या ठिकाणचा वीजपुरवठा खंडीत केला होता. त्यानंतर पीटीआयचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची झाली होती.





