बर्लिन : जर्मनीमध्ये पुन्हा गर्दीमध्ये भरधाव कार घुसवण्याचा दहशतवादी हल्ला घडला आहे. या हल्ल्यात एक व्यक्ती ठार झाला आणि अन्य काही जण जखमी झाले आहेत. सोमवारी जर्मनीतल्या मॅनहाइम शहरात ही घटना घडली. या हल्ल्यानंतर पोलिसांनी नागरिकांना शहरातील वर्दळीच्या रस्त्यांपासून दूर आणि घरातच राहण्याची सूचना केली आहे. या हल्ल्यातील संशयिताला पोलिसांनी अटक केली असून तो सध्या पोलिसांच्या कोठडीत आहे. मॅनहाइममधील पादचाऱ्यांसाठी असलेल्या पॅराडेप्लॅट्झ रस्त्यावर एका चालकाने लोकांवर गाडी चालवली, त्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला, असे पोलिस प्रवक्ते स्टीफन विल्हेल्म म्हणाले. अनेक लोक जखमी झाले आहेत, परंतु किती जण किंवा किती गंभीर जखमी झाले हे पोलिस अद्याप स्पष्ट करू शकत नाहीत, असेही त्यांनी सांगितले. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून या हल्ल्यामागे कोणाकोणाचा हात होता, हे आताच सांगता येऊ शकत नाही. त्याबद्दल काहीही माहीती देता येऊ शकत नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी हा पादचारी मार्ग नागरिकांसाठी बंद केला असून या मार्गावर नाकाबंदी करण्यात आली आहे. परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला गेला असून हेलिकॉप्टरच्या माध्यमातून परिसरावर देखरेख केली जात आहे. पादचाऱ्यांना धडक देणाऱ्या कारचे या घटनेनंतर चांगलेच नुकसान झाले असल्याचे आढळून आले. जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी या परिसरात मोठ्या संख्येने रुग्णवाहिका आल्या असल्याचे सोशल मीडियावर पोस्ट झालेल्या फोटोंमध्ये दिसते आहे. हा एक प्राणघातक हल्ला होता, असे पोलिसांच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. पॅराडेप्लॅट्झ हा शहराच्या मध्यभागी एक प्रमुख चौक असून मॅनहाइममधील पादचाऱ्यांसाठी असलेल्या रस्त्याच्या शेवटी आहे, फ्रॅन्कफर्ट शहराच्या दक्षिणेला अंदाजे ८५ किलोमीटर अंतरावर असलेले मॅनहाइम या शहराची लोकसंख्या अवघी ३ लाख २६ हजार आहे. घटनेमध्ये मोठ्या संख्येने लोक जखमी झाल्याचा अंदाज असून मॅनहाइम युनिव्हर्सिटी रुग्णालयामध्ये उपचारांसाठी मोठी तयारी करण्यात आली आहे. सोमवारच्या घटनेला पोलिसांनी दहशतवादी हल्ला म्हणून अजून तरी संबोधलेले नाही. तरी, अलिकडच्या काही महिन्यांत हिंसाचाराच्या अनेक घटनांमध्ये गाड्यांचा वापर घातक शस्त्रे म्हणून करण्यात आला आहे. त्यामुळे हा हल्ला देखील दहशतवाद्याने घडवून आणलेला हल्ला असण्याची शक्यता दाट आहे. मोठी जीवितहानी टळली… संपूर्ण जर्मनीमध्ये, अनेक लोकांनी कार्निव्हल साजरा करण्यासाठी मोठी वीक एन्डची सुट्टी घेतली होती.या कार्निव्हलमध्येच रोझ मंडेचाही समावेश होता. या कार्निव्हलमध्ये अनेक शहरांमध्ये शोभायात्रा आयोजित केल्या जातात. रविवारी मॅनहाइमच्या रस्त्यावर आधीच परेड झाली होती. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मॅनहाइममधील घटनेमुळे जर्मन गृहमंत्री नॅन्सी फेसर यांनी कोलोनमधील कार्निव्हल स्ट्रीट परेडमधील सहभाग रद्द केला. मॅनहाइममधील घटनेत जखमी झालेल्यांवर उपचार करण्याला आता प्राधान्य दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यापुर्वीच्या घटना गेल्या महिन्यात म्युनिकमध्ये कामगार संघटनेच्या निदर्शनावर कारने केलेल्या हल्ल्यात अनेक जखमी झाले होते. जखमींपैकी एका २ वर्षांच्या मुलीचा आणि तिच्या आईचा दोन दिवसांनी मृत्यू झाला होता. हल्ल्यानंतर जर्मनीत आश्रय शोधणाऱ्या २४ वर्षीय अफगाण तरुणाला लगेच अटक करण्यात आली. त्याचा इस्लामिक अतिरेकी हेतू होता, असे सरकारी वकिलांनी सांगितले. गेल्या वर्षी पूर्व जर्मनीतील मॅग्डेबर्ग शहरात एका कारने ख्रिसमस मार्केटमध्ये धडक दिल्याने सहा जणांचा मृत्यू झाला आणि २०० हून अधिक जण जखमी झाले होते. अटक करण्यात आलेला संशयित हा ५० वर्षीय डॉक्टर आहे आणि तो मूळचा सौदी अरेबियाचा आहे. त्याने मुस्लिमविरोधी विचार व्यक्त केले होते आणि अतिउजव्या, स्थलांतरित विरोधी अल्टरनेटिव्ह फॉर जर्मनी पक्षाला पाठिंबा दिला होता.