Chhattisgarh Road Accident : रायपूरमध्ये भीषण अपघात; ट्रक आणि ट्रेलरच्या धडकेत १३ जणांचा मृत्यू

छत्तीसगड : छत्तीसगडची राजधानी रायपूरमधील विधानसभा पोलीस स्टेशन परिसरात रविवारी रात्री उशिरा एक भीषण रस्ता अपघात झाला. या अपघातात १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. खारोरा-बालोदा बाजार रोडवर लोक माझदा गाडीतून मुलांच्या वाढदिवसाच्या समारंभातून परतत असताना हा अपघात झाला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, माझदा गाडी खारोरा परिसरात पोहोचताच, विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका वेगवान ट्रेलर ट्रकने तिला जोरदार धडक दिली. ही टक्कर इतकी भीषण होती की १३ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये ९ महिला, २ मुली, १ मुलगा आणि ६ महिन्यांच्या बाळाचा समावेश आहे.
या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी खरोरा सामुदायिक आरोग्य केंद्र आणि वैद्यकीय महाविद्यालय रायपूर येथे दाखल करण्यात आले. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मदत आणि बचाव कार्य सुरू केले.
घटनेची माहिती मिळताच संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून वरिष्ठ पोलिस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या अपघातामुळे रस्ते सुरक्षेवर आणि जड वाहनांच्या निष्काळजीपणावर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
रायपूरचे एसपी लाल उम्मेद सिंह यांनी सांगितले की, हे लोक चौथिया छट्टी येथून एका कार्यक्रमात सहभागी होऊन परतत होते यावेळी हा अपघात झाला. या अपघातात इतर अनेक जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. जखमी नागरिकांना ताबडतोब डॉ. बी.आर. यांच्याकडे नेण्यात आले.
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, चतौड गावातील एक कुटुंब बन्सरी गावात एका कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते. परतताना खारोरा पोलीस स्टेशन परिसरातील सारगावजवळ ट्रक आणि ट्रेलरची टक्कर झाली.





