उरुळी कांचन (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत बुधवारी (८ ऑक्टोबर) दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास स्कूल बस आणि लोखंडी गज वाहतूक करणाऱ्या पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला. पिकअपमधील लोखंडी सळया स्कूल बसच्या मागील भागात घुसल्या, तर पिकअपला मागून येणाऱ्या हायवानेच जोरदार धडक दिली. ही घटना देवकर पेट्रोल पंपाजवळ घडली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ही स्कूल बस ‘ऑलिंपस स्कूल ऑफ एक्सलन्स’ संस्थेची असून, पुणे येथून उरुळी कांचनकडे जात होती. याचवेळी लोणी काळभोर येथील ‘गुरुदत्त सेल्स कार्पोरेशन’च्या पिकअपने समोरून धडक दिली. अपघाताचे नेमके कारण अद्याप निश्चित झाले नसले तरी वाहनांचा वेग आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन कारणीभूत असावे, असे प्राथमिक तपासात निदर्शनास आले आहे. अपघातानंतर घटनास्थळी वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. उरुळी कांचन पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. अपघाताची नोंद घेणे आणि तपास सुरू आहे. या महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे वाहनचालकांना सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.