Khambatki Accident: खांबाटकी घाटात भीषण अपघात; ब्रेक फेल ट्रकने तीन गाड्यांचा केला चक्काचूर

प्रभात वृत्तसेवा
खंडाळा – पुणे – बंगळुरू महामार्गावर पुण्याच्या दिशेने जाताना खांबाटकी घाटातील बोगद्याबाहेरील कॅनॉलजवळ ब्रेकफेल ट्रकने तीन वाहनांना धडक दिली. या अपघातामध्ये ट्रकचालकासह चारजण जखमी झाले असून वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
याप्रकरणी पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, पुण्याच्या दिशेने जाणारा ट्रक (एमपी 09 एचएच 8527 ) ब्रेक फेल झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. बोगद्यानंतर येणार्या दुसर्या वळणावर ट्रकने तीन चारचाकी वाहनांना पाठीमागून जोराची धडक दिली व ट्रक पलटी झाला.
या अपघातामध्ये ट्रकचालक अंबादास बापूजी मालवी (वय 38, रा. डोंगरखेडा, ता. मोहिदपूर, जि. उज्जैन, राज्य मध्यप्रदेश), चारचाकी वाहन चालक सचिन सुरेश बोधले (वय 50, रा.गोडोली सातारा), प्रवासी मंगेश बाळू चौगुले (वय33) व झुंबरबाई बाळू चौगुले (वय 50, दोन्ही रा. विटा घुमटमाळ, ता. खानापूर, जि.सांगली) असे एकूण चार जण जखमी झाले आहेत.
घटनास्थळी भुईज महामार्ग पोलीस उपनिरीक्षक शाम गोरड व खंडाळा पोलिसांनी तत्काळ धाव घेत क्रेनच्या सहाय्याने वाहने बाजूला केली.या अपघाताची नोंद खंडाळा पोलीस स्टेशनला झाली असून सहाय्यक पोलीस फौजदार अशोक जाधव पुढील तपास करीत आहेत.





