“तेरी जीत से ज्यादा मेरे हार के चर्चे है”; राम सातपुतेंचा शायरीतून प्रणिती शिंदेंना टोला

Ram Satpute Vs Praniti Shinde| सोलापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदे यांनी भाजपाचे आमदार राम सातपुते यांचा पराभव केला. येथील निवडणुक चांगलीच चर्चेत राहिली होती. यानंतर नुकत्याच झालेल्या सोलापूरमधील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राम सातपुते यांनी प्रणिती शिंदे यांच्यावर टीका केली आहे. “इतना भी गुमान मत कर तेरी जीत पर क्यो की तेरी जीत से ज्यादा मेरे हार के चर्चे है”, असा टोला राम सातपुते यांनी प्रणिती शिंदे यांना लगावला.
राम सातपुते हे सोलापुरात भाजपच्या कार्यकर्त्यांचे आभार मानण्यासाठी आले होते. त्यावेळी राम सातपुतेंनी हिंदी शायरीतून प्रणिती शिंदे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. राम सातपुते म्हणाले की, “सोलापूरच्या जनतेचे आभार मानण्यासाठी मी आज आलो आहे. सोलापूरच्या जनतेनं आम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान केलं आहे. आम्ही पराभव मोठ्या मनाने स्वीकारला आहे.”
काय म्हणाले राम सातपुते ?
“चंद्रकांत पाटील यांच्याबाबत सोलापूरच्या खासदारांनी ज्या प्रकारे उल्लेख केला, त्याचा मी निषेध करतो. चंद्रकांत पाटील यांच्या वयाचा त्यांनी विचार करायला हवा होता. मात्र, राजकीय संस्कृती त्यांना नाही. त्या ज्या पद्धतीने भाषा वापरतात, ज्या पद्धतीची स्टंटबाजी करतात. हा येथील जनता पाहता आहे. इतना भी गुमान मत कर तेरी जीत पर क्यो की तेरी जीत से ज्यादा मेरे हार के चर्चे है”, असा खोचक टोला राम सातपुते यांनी खासदार प्रणिती शिंदे यांना लगावला.
“सोलापूरच्या जनतेशी आमचे त्रुणानुबंध आहेत. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या पराभवामधून शिकण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, आमच्या कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीत ज्या प्रकारे काम केलं, त्यांचं कौतुक केले पाहिजे. सर्वात महत्वाची गोष्ट असते की, माणसाला पराभव पचवता आला पाहिजे. तसंच विजय देखील पचवता आला पाहिजे. मात्र, विरोधकांना विजय पचवता येत नाही. सोलापूरच्या जनतेचे प्रश्न त्या कधीही सोडू शकत नाहीत, असं वाटतं. त्या फक्त स्टंटबाजी करून जनतेची दिशाभूल करण्याचं काम करत आहेत”, अशी टीका राम सातपुते यांनी प्रणिती शिंदे यांच्यावर केली.
पुढे ते म्हणाले, “सोलापुरातील 5 लाख 46 हजार 028 लोकांनी मला खासदार म्हटले आहे. तुमच्या प्रत्येक हाकेवर मी अर्ध्या रात्री उभा राहीन. मी भिंती रंगवून, वडापाव खाऊन पुढे आलोय, एका पराभवाने मी खचणारा कार्यकर्ता नाही. मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले हे आमचे भाग्य आहे. भाजप ही राष्ट्रभक्तांची पार्टी आहे. भाजप कार्यकर्ता निवडणूक हरत नाही, तो एकतर जिंकतो किंवा पराभवातून शिकतो,” असा विश्वासही सातपुते यांनी कार्यकर्त्यांना दिला.





