Pimpri-Chinchwad: भाडेकरूंची होतेय आर्थिक पिळवणूक… घरमालकांच्या मनमानीला आळा कोण घालणार?
डिपॉझिट परत करताना विविध कारणांनी मोठी कपात

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात शिक्षण, नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने बाहेरून येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे शहरातील विविध भागांत भाड्याने राहणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. मात्र या भाडेकरूंना घरमालकांकडून अनेकदा आर्थिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
चिंचवड, बिजलीनगर, निगडी, मोशी, नवी सांगवी, वाल्हेकरवाडी तसेच इतर परिसरातील चाळीसारख्या इमारतींमध्ये या समस्या अधिक जाणवत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.
शहरात नोकरीसाठी येणारे तरुण, विद्यार्थी, कामगार, लहान व्यावसायिक आणि कुटुंबे यांना सुरुवातीला घर भाड्याने घेण्यासाठी मोठी रक्कम डिपॉझिट म्हणून द्यावी लागते. त्यानंतर दर महिन्याला ठरलेले भाडे भरावे लागते. घरमालक आणि भाडेकरू यांच्यातील व्यवहार विश्वासावर आधारित असतो. मात्र घर रिकामे करताना हाच व्यवहार वादाचा विषय ठरत असल्याचे चित्र आहे.
घर घेताना ठरलेली डिपॉझिटची रक्कम परत मिळेल, अशी अपेक्षा भाडेकरूंची असते. मात्र, वॉश बेसिन खराब झाले आहे, भिंतींचा रंग उडाला आहे, घराची रंगरंगोटी करावी लागेल, वायरिंग बदलावी लागेल, नळ दुरुस्त करावे लागतील, अशा विविध कारणांचा आधार घेत डिपॉझिटमधून पैसे कापले जातात.
काही वेळा या दुरुस्तीचा प्रत्यक्ष खर्च किती झाला, याची माहितीही भाडेकरूला दिली जात नसल्याचे सांगण्यात येते. घरमालकाने सांगितलेली कपात मान्य करण्याशिवाय भाडेकरूकडे पर्याय राहत नाही. त्यामुळे अनेक वर्षे नियमित भाडे भरून राहिल्यानंतरही घर सोडताना आर्थिक नुकसान सहन करावे लागते.
विशेष म्हणजे, घर सोडणाऱ्या भाडेकरूला डिपॉझिटमधील उर्वरित रक्कम मिळाली तरी नव्या घरासाठी पूर्वीपेक्षा अधिक डिपॉझिट पुन्हा भरावे लागते. आधीच्या घरमालकाने मोठी कपात केल्यामुळे हातात कमी पैसे येतात.
त्यामुळे नवीन घर मिळविण्यासाठी भाडेकरूला स्वतःच्या खिशातून आणखी रक्कम उभी करावी लागते. शिफ्टींगसाठी अतिरिक्त खर्च करावा लागतो. दर दोन ते तीन वर्षांनी निर्माण होणाऱ्या या परिस्थितीमुळे नोकरी किंवा व्यवसायासाठी शहरात आलेल्या नागरिकांसाठी ही मोठी आर्थिक अडचण ठरत आहे.
वीज मीटर एकच, बिल मात्र अनेकांच्या माथी
चिंचवड, बिजलीनगर आणि वाल्हेकरवाडी परिसरात चाळीसारख्या पद्धतीच्या अनेक इमारती आहेत. अशा काही इमारतींमध्ये अनेक खोल्या किंवा सदनिकांसाठी एकच वीज मीटर असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे प्रत्येक भाडेकरूने किती वीज वापरली आणि त्यानुसार त्याच्याकडून किती पैसे घ्यायचे, याबाबत स्पष्टता राहत नाही. घरमालकांकडून वीजबिल दाखविण्याऐवजी भाडेकरूंना वापरलेल्या युनिटची माहिती सांगितली जाते आणि त्यानुसार पैसे घेतले जातात.
भाडेकरूंची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक
भाडेकरूंच्या आर्थिक शोषणाबरोबरच शहराच्या सुरक्षेचा प्रश्नही महत्त्वाचा बनला आहे. घरमालकांनी भाडेकरू ठेवताना त्यांची ओळख आणि आवश्यक माहिती तपासून ती पोलिसांना देणे अपेक्षित आहे. मात्र, काही घरमालक कोणतीही चौकशी न करता किंवा पोलिसांना माहिती न देता भाडेकरू ठेवत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे पोलिसांच्या दृष्टीने ही बाब डोकेदुखी ठरत आहे.
घरमालकांनी केवळ भाडे मिळविण्यापुरता विचार न करता भाडेकरूंची योग्य माहिती घेणे आणि ती पोलिसांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. त्यामुळे भाडेकरू ठेवताना आवश्यक माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या घरमालकांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.





