दरवर्षी दहा प्राथमिक आरोग्य केंद्रे स्मार्ट पीएचसी बनवणार : नागराजन

कोयनानगर : हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्रातून आरोग्य विभागाने स्मार्ट सेवा द्यावी. या केंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी २४ तास दर्जेदार काम करावे, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन यांनी दिल्या. त्याचबरोबर जिल्ह्यातील १० प्राथमिक आरोग्य केंद्रे दरवर्षी स्मार्ट केंद्रे बनवणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
कोयना विभागातील दुर्गम नाव, मळे, कोळणे, पाथरपुंज या गावांना याशिनी नागराजन यांनी अचानक भेट देऊन विकासकामाची पाहणी करून नागरिकांशी थेट संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत गटविकास अधिकारी सरिता पवार, सहायक गटविकास अधिकारी धनावडे, तालुका वैधकीय अधिकारी नवनाथ कांबळे, गटशिक्षणाधिकारी दीपा बोरकर, सरपंच गजानन कदम, अमोल देसाई आदी उपस्थित होते.
यावेळी याशिनी नागराजन म्हणाल्या, ‘‘नाव व पाथरपुंज या दुर्गम भागातील शाळेचा दर्जा उत्तम आहे. शिक्षण विभागासाठी व अंगणवाडीसाठी ग्रामीण भागात सर्व भौतिक सुविधा पुरविणार आहे. दुर्गम असणाऱ्या मळे, कोळणे, पाथरपुंज या ठिकाणी वळण बंधारे, पाझर तलाव बांधणे गरजेचा असून त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
आरोग्य केंद्रात अपुरा कर्मचारी वर्ग
हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्रात अपुरा कर्मचारी वर्ग आहे. याठिकाणी २४ तास आरोग्य सुविधा मिळाव्यात, त्याचबरोबर निवासी सोय याठिकाणी असल्याने कर्मचाऱ्यांनी मुक्कामी राहवे, दर्जेदार सेवा द्यावी, अशा मागण्या सरपंच गजानन कदम यांनी केल्या. अत्यावश्यक सेवा मिळावी, स्टाफ मिळावा, औषध पुरवठा करण्यात यावा, अशी लेखी मागणी त्यांनी केली. कोयना विभागातील दुर्गम व शिवकालीन भैरवगड या किल्ल्याची पाहणी याशिनी नागराजन यांनी केली. या किल्ल्यावर भ्रमंती करणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत.


