पुणे – कोथरुड पोलीस ठाण्यात निलेश घायवळ, त्याचा भाऊ सचिन घायवळ आणि त्याच्या टोळीतील आठ जणांविरुद्ध बेकायदेशीर ताबा, खंडणी आणि शस्त्र बाळगणे अशा गंभीर कलमांअंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या टोळीने फिर्यादीच्या मालकीच्या इमारतीतील दहा सदनिकांवर अवैधरीत्या कब्जा केल्याचा आरोप आहे. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी निलेश घायवळ, सचिन घायवळ, बापू कदम, ओंकार उर्फ चिक्या फाटक, मनीष माथवड, सागर चौधरी, माऊली तोंडे, निलेश शर्मा आणि आणखी ५ ते ७ व्यक्तींनी जून २०१८ ते मे २०२५ या कालावधीत फिर्यादींच्या इमारतीत बेकायदेशीरपणे प्रवेश करून खंडणीच्या स्वरूपात ताबा घेतला. तक्रारीत म्हटले आहे की, आरोपी निलेश घायवळ याने पिस्तूल फिर्यादीच्या डोक्याला लावून धमकी दिली आणि इमारतीतील सदनिकांचा बेकायदेशीर ताबा घेतला. त्यानंतर बापू कदम हा भाडेकरूंमकडून भाडे गोळा करून ते निलेश घायवळ यास देत असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. तपास सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र आळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतिष चव्हाण हे करीत आहेत. सचिन घायवळचे शस्त्र परवाना प्रकरण राज्यभर गाजत आहे. गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या सहीनंतरच सचिन घायवळ याला शस्त्रपरवाना देण्यात आल्याची बाब समोर आली. यावर मोठ्या प्रमाणात टीका -टीपणी झाल्यावर योगेश कदमांनी खुलासाही जाहीर केला. मात्र त्यानंतर तातडीन सचिन घायवळवरती खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.