मोठी बातमी ! कोंढवा परिसरात एटीएस आणि पुणे पोलिसांची संयुक्त छापेमारी; दहशतवादी संबंधांची चौकशी

पुणे : कोंढवा परिसरात दहशतवादी संबंधांबाबत मिळालेल्या गुप्त माहितीनंतर महाराष्ट्र अँटी टेररिझम स्क्वॉड (एटीएस) आणि पुणे पोलिसांनी मोठी संयुक्त कारवाई केली. बुधवारी उशिरा रात्रीपासून गुरुवारी सकाळपर्यंत चाललेल्या या कारवाईदरम्यान तब्बल १९ ठिकाणी एकाचवेळी छापे टाकण्यात आले.
या कारवाईत अनेक संशयित व्यक्तींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, पोलिसांना काही महत्त्वाचे पुरावे आणि दस्तऐवजही हस्तगत झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ज्यांच्या घरांवर छापे टाकण्यात आले, त्या सर्व व्यक्तींची ओळख, पार्श्वभूमी आणि हालचालींची सविस्तर चौकशी करण्यात येत आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही कारवाई राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित अत्यंत संवेदनशील तपासाचा भाग असून, मिळालेल्या माहितीच्या आधारे पुढील कार्यवाही केली जाणार आहे. पोलिसांनी या कारवाईबाबत अधिकृत तपशील सध्या गुप्त ठेवला आहे.





