Weather Update : तापमानाचा पारा आणखी घसरणार ! विदर्भ वगळता उर्वरित राज्यात उद्या पावसाची शक्यता

मुंबई : आगामी दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात तापमानाचा पारा आणखी दोन ते चार अंशांनी घटणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भ वगळता उर्वरित राज्यात त्यानंतर तापमानात वाढ होऊन हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे.
मात्र, विदर्भातील तापमान हे कोरडे राहण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने व्यक्त केलेले अंदाजानुसार आगामी 10 आणि 11 जानेवारी रोजी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकाची योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला देखील हवामान विभागाच्या वतीने देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात तापमानात घट नोंदवण्यात आली आहे.
12 ते 16 अंशापर्यंत किमान तापमानाची नोंद या परिसरात घेण्यात आली आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे 10 आणि 11 जानेवारी रोजी या भागात हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
धुळे जिल्ह्यात किमान तापमान 4.4 अंशावर
उत्तरेकडील राज्यांमध्ये थंड आणि कोरड्या वाऱ्यांच्या प्रवाह वाढला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील तापमानावर त्याचा परिणाम होत आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणचे तापमान दोन ते चार अंशाने घटले असल्याची नोंद घेण्यात येत आहे. आगामी 24 तासात किमान तापमान वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात कमालीची घटना झाली आहे. त्यामुळे येथील नागरिकांना थंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. धुळे जिल्ह्यात किमान तापमान 4.4 अंशावर पोहोचले आहे. त्यामुळे येथील थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे.





