IND vs SA : टेम्बा बावुमाचा ‘वर्ल्ड रेकॉर्ड’! कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ‘हा’ पराक्रम करणारा जगातील पहिलाच कर्णधार

टेम्बा बावुमा: कसोटी इतिहासातील ‘अजेय’ कर्णधार
टेम्बा बावुमा आता कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिला असा कर्णधार ठरला आहे, ज्याने आपल्या कारकिर्दीतील पहिल्या १२ कसोटी सामने अपराजित राहून खेळले आहेत. या १२ कसोटी सामन्यांमध्ये बावुमाच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेने ११ सामन्यांत विजय मिळवला आहे, तर केवळ एक सामना अनिर्णीत राहिला आहे. यापूर्वी, हा विक्रम बेन स्टोक्स आणि लिंडसे हॅसेट यांच्या नावावर होता. या दोन्ही कर्णधारांनी त्यांच्या पहिल्या १२ कसोटी सामन्यांमध्ये १० विजय मिळवले होते, मात्र बावुमा यांनी ११ सामने जिंकत त्यांना मागे टाकले आहे.
‘बावुमा इफेक्ट’ आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप –
विशेष म्हणजे, जेव्हा दक्षिण आफ्रिकेचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर होता, तेव्हा बावुमा दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. एडन मार्करमने कर्णधारपद सांभाळले होते आणि त्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेला एका सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. पण बावुमाने कर्णधार म्हणून संघात परत येताच, संघ पुन्हा एकदा विजयाच्या मार्गावर स्वार झाला.
यापूर्वी बावुमाच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला पराभूत करून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (WTC) किताब जिंकला होता. अनेक वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने आयसीसी (ICC) चे कोणतेही विजेतेपद पटकावले होते. सध्या देखील संघ डब्ल्यूटीसी फायनलच्या शर्यतीत स्वतःला कायम ठेवून आहे.
२५ वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती –
भारतीय खेळपट्ट्यांवर कसोटी सामना जिंकणे दक्षिण आफ्रिकेसाठी नेहमीच कठीण राहिले आहे, पण यावेळी त्यांनी भारतीय संघाचा घरच्या मैदानावर अक्षरशः सुपडा साफ केला आहे. बावुमाच्या नेतृत्वाखालील संघाने सुमारे २५ वर्षांपूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे. यापूर्वी, २००० मध्ये दक्षिण आफ्रिकेने भारताला दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पराभूत केले होते. बावुमा यांच्या नेतृत्वाखालील हा ‘विजयरथ’ आणखी किती दिवस कायम राहतो, हे पाहणे क्रिकेटप्रेमींसाठी उत्सुकतेचे ठरणार आहे.





